ISRO : इस्त्रो हेरगिरी प्रकरणातील ४ आरोपींचा जामीन सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द | पुढारी

ISRO : इस्त्रो हेरगिरी प्रकरणातील ४ आरोपींचा जामीन सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : इस्त्रो (ISRO) हेरगिरी प्रकरणातील चार आरोपींचा जामीन सर्वोच्च न्यायालयाकडून शुक्रवारी रद्द करण्यात आला. इस्त्रोचे शास्त्रज्ञ नांबी नारायणन यांना हेरगिरीच्या प्रकरणात अडकविल्याचा गंभीर आरोप चारही जणांवर आहे. या चौघांमध्ये केरळचे माजी पोलिस महासंचालक सी. बी. मॅथ्यूज, गुजरातचे माजी अतिरिक्त पोलिस महासंचालक आर. बी. श्रीकुमार यांचा समावेश आहे.

इस्त्रोमधील (ISRO) शास्त्रज्ञ नांबी नारायणन यांना हेरगिरीच्या खोट्या प्रकरणात फसविण्यात आल्याचे प्रकरण चांगलेच गाजले होते. 1994 साली हे प्रकरण झाले होते. मॅथ्यूज यांच्यासह चारही आरोपींचा जामीन रद्द करण्यात आला असला तरी सीबीआयने त्यांना पुढील पाच आठवडे अटक करु नये, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. दुसरीकडे आरोपींच्या अटकपूर्व जामिनावर पुन्हा एकदा विचार करा, असे सर्वोच्च न्यायालयाने केरळ उच्च न्यायालयाला सांगितले आहे.

भारतीय अंतराळ मोहिमेशी संबंधित गोपनीय कागदपत्रे दुसऱ्या देशांना पाठविल्याचा आरोप नांबी नारायणन यांच्यावर झाला होता. नारायणन यांच्याशिवाय पाचजणांना त्यावेळी आरोपी करण्यात आले होते. आरोप झाल्यानंतर इस्त्रोमध्ये मोठी खळबळ उडाली होती. तर नारायणन यांना दोन महिने तुरुंगात काढावे लागले होते. नंतर सीबीआयने केलेल्या तपासात नारायणन यांच्यावरील आरोप खोटे असल्याचे दिसून आले होते.

हेही वाचलंत का ? 

Back to top button