भाजपकडून लोकसभा निवडणुकीची तयारी; गडकरी, गोयल यांचे दौरे | पुढारी

भाजपकडून लोकसभा निवडणुकीची तयारी; गडकरी, गोयल यांचे दौरे

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  आगामी लोकसभा निवडणूक पाहता महाराष्ट्रातून जास्तीत जास्त खासदार निवडून आणण्यासाठी भाजपने जय्यत तयारी सुरू केली आहे. या मतदारसंघात भाजपचे बडे नेते दौरे करणार असून त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील पाच खासदारांच्या मतदारसंघांचाही समावेश आहे. भाजपने लक्ष केंद्रित केलेल्या लोकसभा मतदारसंघात उत्तर – पश्चिम मुंबई, नाशिक, मावळ, यवतमाळ आणि रामटेक लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. त्यामुळे शिंदे गट आणि भाजपमध्ये जुंपण्याची शक्यता आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेत राज्यातील 17 लोकसभा मतदारसंघांतील संघटना बांधणीसाठी लोकसभा प्रवास योजना सुरू केल्याची माहिती दिली. भाजपचे केंद्रीय मंत्री या लोकसभा मतदारसंघात दौरे करून लोकांशी संपर्क साधणार आहेत. या माध्यमातून राज्यातील 17 लोकसभा मतदारसंघांत राज्यातील केंद्रीय मंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली संघटना अधिक बळकट करण्याचे काम होईल, असे बावनकुळे यांनी सांगितले. यापूर्वीही बारामतीमध्ये केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन, कल्याण लोकसभा मतदारसंघात अनुराग ठाकूर यांनी दौरे करून मतदारसंघात भेटीगाठी घेतल्या होत्या.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे अकोला, अमरावती, वर्धा, रामटेक, भंडारा, गडचिरोली आणि यवतमाळ या लोकसभा मतदारसंघांचे प्रभारी असतील; तर केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्याकडे ठाणे आणि उत्तर पश्चिम मुंबई या मतदारसंघांची जबाबदारी असेल. याशिवाय नारायण राणे यांच्याकडे सांगली, रावसाहेब दानवे यांच्याकडे लातूर आणि मावळ, डॉ. भागवत कराड यांच्याकडे परभणी आणि धुळे, डॉ. भारती पवार यांच्याकडे नाशिक आणि कपिल पाटील यांच्याकडे रावेर आणि सोलापूर या मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. या केंद्रीय मंत्र्यांच्या मार्गदर्शनात इतर लोकसभा मतदारसंघात पक्ष बांधणीला बळकटी देण्यात येणार आहे, असे बावनकुळे यांनी सांगितले.

Back to top button