Nashik Niphad : काय आहे ‘थंडा थंडा कूल कूल’ निफाड तालुक्याचे रहस्य? | पुढारी

Nashik Niphad : काय आहे 'थंडा थंडा कूल कूल' निफाड तालुक्याचे रहस्य?

 दीपक श्रीवास्तव : निफाड (जि. नाशिक)

कधीकाळी थंडीचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माथेरान महाबळेश्वरचा सन्मान गेल्या काही वर्षांपासून निफाडने (Nashik Niphad) हिरावून घेण्याचा सपाटा लावलेला आहे. संपूर्ण देश विदेशात द्राक्षांसाठी प्रख्यात असलेल्या नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात हाडे गोठवणारी थंडी पडत असते. राज्यात शीतलहर आली की निफाडचा पारा वेगाने शून्य अंशाच्या दिशेने सरकू लागतो. डिसेंबर जानेवारी या दोन महिन्यांच्या काळात तर अनेकदा या परिसरात शेतांमधील झाडाझुडपांवर दव बिंदू गोठल्याचे चित्र बघायला मिळते.

सोशल मीडियावर गमतीने असे देखील मेसेज व्हायरल होतात की  ”क्या रखा है सिमला और नैनिताल मे, कुछ दिन तो गुजारो हमारे निफाड मे”

संपूर्ण राज्यातील विक्रमी थंडी निफाड परिसरातच का पडते हा सर्वांसाठी एक कुतूहल जागवणारा प्रश्न आहे. या प्रश्नाचे उत्तर शोधण्याआधी निफाडची भौगोलिक रचना समजून घेणे गरजेचे आहे.

नाशिक शहराच्या उत्तर आणि पूर्व दिशेला निफाड तालुक्याचा (Nashik Niphad) विस्तार पसरलेला आहे. गोदावरी, कादवा, वडाळी बाणगंगा अशा नद्यांचा हा परिसर.  नांदूर मधमेश्वर धरणाचा विस्तीर्ण जलाशय देखील याच परिसरात. संपूर्ण तालुका हा ऊस, द्राक्ष, कांदा, गहू, मका, सोयाबीन, टोमॅटो अशा पिकांमुळे बारमाही बागायती झालेला आहे. तालुका भरात सर्वत्र शेततळे, विहिरी, कालवे आणि उपसा जलसिंचन यामुळे वर्षभर जमिनीत पाणी मुरत असते. कडक उन्हाळ्यात देखील येथील बागायती हिरवी ठेवण्याची ताकद शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेली आहे. हवामान थंड असल्याने या परिसरातील बाष्पीभवनाचा वेग ही इतर भागांच्या तुलनेने खूप कमी असतो. या ठिकाणची माती सुद्धा पाणी धरून ठेवणारी असल्यामुळे दीर्घकाळ ओल टिकून राहू शकते. या संपूर्ण परिस्थितीमुळे अन्य ठिकाणांपेक्षा या परिसरात उष्णतापमान सरासरी पेक्षा कमी आढळते.

दैनिक पुढारीने 2011 साली सर्वप्रथम हवामान शास्त्राचे अभ्यासक प्राध्यापक किरण कुमार जोहरे यांच्या मदतीने निफाडला विक्रमी थंडी का पडते? या प्रश्नाचा वेध घेण्याचा प्रयत्न केलेला होता. प्रा. जोहरे यांनी त्यावेळेस जे काही मुद्दे मांडलेले होते ते आज देखील तितकेच लागू पडताना आढळतात. त्यांच्या अभ्यासानुसार निफाड तालुक्याची समुद्रसपाटीपासूनची उंची ही 569 मीटर इतकी आहे. संपूर्ण प्रदेश हा सखल असून कोणत्या ही उंच डोंगर पर्वतरांगा या ठिकाणी नाहीत. हवेची घनता देखील या ठिकाणी जास्त आढळून येते. वातावरणात हवेचा थर साठून राहतो. जास्त घनतेमुळे जास्त दाबाचा प्रदेश तयार होतो. हवेच्या जास्त दाबाचा भाग असल्यामुळे तापमान कमी होते. सर्वत्र हिरवीगार पिके, झाडी- झुडपे, शेतमळे, साठवण बंधारे, शेततळी, बारमाही बागायती शेती, भरपूर पाणी सिंचित प्रदेश मोठा, जमिनीची जलधारणा क्षमता देखील जास्त आणि वाऱ्याचा वेग कमी या सर्व गोष्टींचा परिणाम होऊन तापमान कमी होते आणि दीर्घकाळ स्थिर राहते. आकाश निरभ्र राहत असल्यामुळे वातावरणातील उष्णता अधिक उंच भागात निघून जाते आणि त्या तुलनेत भूप्रदेशाचा भाग हा अधिक थंड होतो या सर्व गोष्टींचा एकत्रित परिणाम होऊन निफाड परिसरामध्ये इतर परिसराच्या तुलनेने तापमान घसरलेले आढळते.

निफाडच्या या सातत्याने कमी होणाऱ्या तापमानाचा द्राक्ष उत्पादकांना मोठा फटका वारंवार सहन करावा लागतो. तर गहू आणि हरभरा या पिकाला ही थंडी पोषक असल्यामुळे या परिसरात गव्हाचे आणि हरभऱ्याचे उत्पन्न जोमदार येत असते. सध्या मात्र बदलत्या पीक पॅटर्ननुसार द्राक्षशेती मोठ्या प्रमाणात होऊ लागलेली आहे. वाढत्या थंडीचा फटका बसून द्राक्ष उत्पादनात घट होते. द्राक्षांचा दर्जा देखील खालावतो. त्यामुळे द्राक्ष उत्पादकांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागतो.

मुंबई पुण्याच्या लोकांसाठी गुलाबी आणि मखमली असणारी थंडीही निफाडच्या द्राक्ष उत्पादकांसाठी मात्र जीवघेणी ठरते यात शंका नाही.

हेही वाचा :

Back to top button