थंडीमध्ये बाळाला आंघोळीपूर्वी करा मालिश, जाणून घ्या फायदे | पुढारी

थंडीमध्ये बाळाला आंघोळीपूर्वी करा मालिश, जाणून घ्या फायदे

लहान बाळांना सर्वांगाला अभ्यंग मालिश करणे महत्त्वाचे आहे. रोज मालिश केल्याने त्यांचे रक्ताभिसरण सुधारून त्यांना विश्रांती मिळते व त्यांना चांगली गाढ झोप लागते.

बाळाची नाळ गळून पडल्यानंतर पूर्णपणे सुकली व बाळाच्या जन्माच्या 1-2 आठवड्यांनंतर बाळाला घरच्या घरी मसाज करता येतो.
बाळाची बेंबी कोरडी आहे आणि आत तेल जात नाही याची खात्री करा. हलक्या हाताच्या दाबाने साधे स्ट्रोक पुरेसे आहेत. बाळाला त्याचा आनंद घेता आला पाहिजे.

बाळाचे मालिश करणे सोपे आहे. उगाच विनाकारण सोशल मीडियावरील जास्त व्हिडीओज पाहून बाळाचे मालिश अनावश्यकपणे अवघड करू नका. ठरावीक वयानंतर तुमचे बाळ मसाजसाठी एका जागी बसणार नाही, तर जोवर तुमचे बाळ तुमच्याकडून शांत मालिश करून घेत असेल तोपर्यंत तुम्ही त्याला मालिश देऊ शकता. त्यामध्ये वयाचे बंधन नाही.

वेळ – 5-10 मिनिटे पुष्कळ. जास्त काळ मालिश करण्याचे कोणतेही अतिरिक्त फायदे नाहीत.

फायदे ः बाळ चांगले झोपते, पोटशुळीची समस्या कमी होते. आई आणि बाळामध्ये चांगले संबंध निर्माण होतात. बाळाच्या पचनास मदत करते. गॅसेस आणि बद्धकोष्ठता कमी करते. त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. तुमच्या बाळाच्या शरीराची जाणीव वाढवते. बाळाचे एकंदरीत व्यक्तिमत्त्व सुधारते. त्वचा सुकुमार व शरीर द़ृढ बनते.

बाळाला नियमित आंघोळीपूर्वी मसाजासाठी तिळाचे तेल थोडेसे कोमट करून वापरावे. बदाम तेल, ऑलिव्ह तेल हे पर्याय आहेत. मात्र, कुठलेही बाजारू, घातक तेल बाळाला मालिशसाठी वापरु नये.

-डॉ. सौ. स्नेहल पाटील 

Back to top button