

पुणे; पुढारी वृत्तसेवा : उत्तर भारतातून मध्य प्रदेशमार्गे महाराष्ट्राकडे येत असलेल्या शीतलहरींमुळे राज्यात थंडीची लाट आली आहे. रविवारपासून वाढलेला थंडीचा कडाका सोमवारीही कायम असल्याने बहुतांश महाराष्ट्र थंडीने गारठला. आणखी दोन दिवस थंडी अशीच राहणार, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.
सोमवारी जळगाव शहराचे किमान तापमान सर्वात नीचांकी 8.2 अंश सेल्सिअस एवढे नोंदले गेले. तथापि, नाशिक जिल्ह्यातील ओझरचा पारा 5.7 अंशांपर्यंत घसरल्याने हे शहर पार गारठून गेले होते. निफाड येथे किमान 7 अंश सेल्सिअस, तर नाशिक येथे किमान 9.2 अंशांपर्यंत पारा खाली घसरला.
रविवारपेक्षा सोमवारी कोल्हापूरचे तापमान 1 अंशाने घसरल्याने अर्थात 15 अंश सेल्सिअसहून 14 वर आल्याने आणखी गारठा वाढला. राज्यातील सरासरी तापमान 8 अंशांवर नोेंदले गेल्याने महाराष्ट्राला हुडहुडी भरली.
दरम्यान, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्याकडे बाष्पयुक्त वारे येऊन ढग तयार होत आहेत, त्यामुळे उत्तर
महाराष्ट्र वगळता राज्यातील उर्वरित भागांतील किमान तापमानात वाढ होऊन थंडीचा कडाका कमी होण्याची शक्यता असल्याचे पुणे हवामान विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी सांगितले.
राज्यात उणे 2.8 ते 6.3 अंशाने घट
हिमालयीन पर्वतरांगांसह जम्मू- काश्मीर भागात होत असलेली बर्फवृष्टी तसेच पश्चिमी चक्रवाताचा वाढलेला प्रकोप, यामुळे संपूर्ण उत्तर भारतातील राज्ये थंडीने गारठली आहेत. त्यामुळे या भागाकडून राज्याकडे शीतलहर (थंड वारे) वाहत आहे. तसेच बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता आंध्रप्रदेशपर्यंत आहे. याच्या परिणामामुळे या भागाकडून राज्याकडे बाष्पयुक्त वारे वाहत आहेत. असे असले तरी थंड वार्यांची तीव्रता जास्त आहे. त्यामुळे राज्यात थंडी वाढली आहे.
त्याचबरोबर राज्यातील कोरड्या हवामानामुळे थंडीचा कडाका वाढला आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे, अहमदनगर, जळगाव, कोल्हापूर, महाबळेश्वर, नाशिक, सातारा, सोलापूर, जळगाव, मालेगाव या शहरात किमान तापमानात सरासरी उणे 2.8 ते 6.3 अंश सेल्सिअसने घट झाली आहे; तर विदर्भात नागपूर 11.4, गोंदिया 10.5, अकोला 12, बुलडाणा 11.7, ब्रह्मपुरी, चंद्रपूर 13.2, वर्धा 12.2 अंश सेल्सिअस नोंद करण्यात आली आहे. विदर्भात सर्वाधिक थंड शहर म्हणून यवतमाळमध्ये 10 अंश सेल्सिअसची नोंद करण्यात आली.
मराठवाड्यातील औरंगाबाद, उस्मानाबाद, परभणी, नांदेड, बीड या शहरांतही कडाक्याची थंडी असून, किमान तापमानात 2.9 ते 5.6 अंश सेल्सिअसने घट झाली आहे. राज्यातील जवळजवळ सर्वच शहरांचा किमान तापमानाचा पारा 10 अंश सेल्सिअसच्या खाली गेला आहे. तर विदर्भात किमान तापमान 10 अंशांच्या आसपास आहे. कोकणातही थंडी वाढली असून, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, डहाणू, मुंबईसह बहुतांश शहरांचे किमान तापमान 17 ते 20 अंश सेल्सिअसच्या आसपास राहिले असले, तरी थंडीचा कडाका जाणवत आहे.
48 तास जाणवणार थंडीची हुडहुडी
दोन दिवसांनंतर उत्तर महाराष्ट्र वगळता थंडी होणार कमी
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्याचा परिणाम