26/11 ला 14 वर्षे पूर्ण; दहशत कायम | पुढारी

26/11 ला 14 वर्षे पूर्ण; दहशत कायम

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्याला शनिवारी 14 वर्षे पूर्ण होत आहेत. 14 वर्षांनंतरही शहरावरील दहशतवादाचे सावट कायम असून या दिवशी कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिसांनी शहरात जागोजागी कडेकोट बंदोबस्त ठेवला असून, केवळ या बंदोबस्ताच्या भरवशावरच 26/11 च्या पूर्वसंध्येला या हल्ल्याचे एक केंद्र असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर रेल्वेच्या प्रतीक्षेत प्रवासी असे बिनधास्त झोपलेले दिसले.

स्वतंत्र भारताच्या इतिहासात एखाद्या शहरावर अतिरेक्यांनी अशा पद्धतीने केलेला हा पहिला हल्ला होता. समुद्रमार्गे मुंबई किनार्‍यावर उतरत 10 पाकिस्तानी अतिरेक्यांनी पूर्ण मुंबई वेठीस धरली. या दहशतवादी हल्ल्यामध्ये 34 विदेशी नागरिकांसह एकूण 166 निष्पापांना आपला जीव गमवावा लागला होता. तर, या हल्ल्यात 700 हून अधिक जण जखमी झाले होते. मुंबई पोलीस आणि केंद्रीय जवानांनी हा हल्ला परतवून लावला. यात 09 दहशतवाद्यांना कंठस्नान घालत आतिरेकी अजमल कसाब याला जिवंत पकडण्यात मुंबई पोलिसांना यश आले. पुढे कसाबला फासवर चढवण्यात तपास यंत्रणांना यश आले. मात्र या हल्ल्यात 18 पोलिस जवानांना वीरमरण आले.

मुंबई पोलिस आयुक्त कार्यालयात 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याचा मुकाबला करताना शहीद पोलिस अधिकारी आणि जवानांना मानवंदना देण्यासाठी अभिवादन संचलन आयोजित करण्यात आलेे आहे. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मान्यवर उपस्थित असतील.

पोलिस जिमखाना, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्स, कामा हॉस्पिटल, नरिमन हाऊस, हॉटेल ताज, हुतात्मा स्मारक, गेट वे ऑफ इंडिया आदी हल्ल्याचे टार्गेट ठरलेल्या ठिकाणांसह मुंबईतील विविध शाळा, महाविद्यालये आणि सामाजिक संस्थांकडून हल्ल्यातील शहीद जवानांना मानवंदना देत आदरांजली वाहण्यात येणार आहे.

Back to top button