कर्नाटक:…सोलापूर, अक्कलकोटही कर्नाटकात घेऊ; बोम्मई यांच्या ट्वीटने सीमाभागासह महाराष्ट्रात संताप | पुढारी

कर्नाटक:...सोलापूर, अक्कलकोटही कर्नाटकात घेऊ; बोम्मई यांच्या ट्वीटने सीमाभागासह महाराष्ट्रात संताप

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा: महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी महाराष्ट्र सरकारने उच्चाधिकार समिती बैठक घेऊन दोन सीमा समन्वय मंत्री नेमले आहेत. यानंतर कर्नाटकाच्या पायाखालची वाळू सरकली असून, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई बेताल वक्तव्य करत आहेत. त्यांनी नुकतेट ट्विट करत ‘…महाराष्ट्रातील सोलापूर आणि अक्कलकोटही कर्नाटकात घेऊ, असे म्हटले आहे. त्याच्या या भडक ट्विटने सीमाभागासह महाराष्ट्रातील अनेक भागात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

जत तालुक्यातील ४२ गावांनी कर्नाटकात जाण्याचा ठराव केला आहे. ती गावे कर्नाटकात आणण्यासाठी आमचे प्रयत्न असणार आहेत, असा दावा करणारे मुख्यमंत्री बोम्मई टीकेचे धनी बनले होते. पण, त्यांनी महाराष्ट्र- कर्नाटक सीमावादावर आपल्या अधिकृत ट्वीटर हँडलवरून बेताल मते मांडण्यास सुरूवात केली आहे. त्यांनी महाराष्ट्रातील सोलापूर आणि अक्कलकोट हे कन्नड भाषिक आहेत. तो कर्नाटकाचाच भाग आहे. त्यामुळे हा भाग आमच्याकडे राहावा, अशी आमची मागणी करणारे ट्वीट केले आहे.

२००४ पासून सुरू असलेला या दोन राज्यातील सीमावाद महाराष्ट्र सरकारने दोन्ही सर्वोच्च न्यायालयात नेला आहे. या लढ्यात आतापर्यंत महाराष्ट्राला यश आलेले नाही. यापुढेही ते येणार नाही. आमचा कायदेशील लढा मजबूत करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, असे देखिल मुख्यमंत्री बोम्मई यांनी केलेल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे. मुख्यमंत्री बोम्मई यांच्या या हेकेखोर भुमिकेविरोधात महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांनी निषेध नोंदवला असून, त्यांनी ट्विटवरून केलेल्या वक्तव्यावर सीमाभागातील नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे.

हेही वाचा:

Back to top button