महाराष्ट्रातील गावे कर्नाटकात नेण्याचा प्रयत्न केल्यास खबरदार! विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा इशारा | पुढारी

महाराष्ट्रातील गावे कर्नाटकात नेण्याचा प्रयत्न केल्यास खबरदार! विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा इशारा

मुंबई : पुढारी वृत्तसेवा
बेळगाव-कारवारसह संयुक्त महाराष्ट्र होण्यासाठी अनेकांनी योगदान दिले असताना आता महाराष्ट्रातील गावे नेण्याचा प्रयत्न आम्ही खपवून घेणार नाही, असा इशारा महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना दिला आहे.

विधानभवनात बुधवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पवार म्हणाले, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलेले वक्तव्य महाराष्ट्रातील जनतेला आवडलेले नाही. कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री भाजपचे आहेत. त्यामुळे यावर एकत्र बसून महाराष्ट्राबद्दल काय भूमिका आहे हे, सरकारने ठोसपणे जनतेला सांगितले पाहिजे. जत तालुका सांगली जिल्ह्यात आहे. त्या जत तालुक्यात कानडी शाळा सुरू आहेत. हे महाराष्ट्राचे अपयश आहे. त्या ठिकाणी मराठी शाळा मोठ्या प्रमाणावर बांधायला हव्या होत्या, याला सरकारसोबत आम्हीही जबाबदार आहोत, असेही पवार यांनी स्पष्ट केले.

शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर पवार यांनी चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, या सरकारने जलसमाधी घेण्याची वेळ शेतकर्‍यांवर येऊ देता कामा नये. आम्ही सरकारमध्ये असताना आंदोलनाची भूमिका कुणी मांडली, तर त्यांच्याशी चर्चा करत होतो. मात्र, आताच्या सरकारला शेतकर्‍यांसोबत चर्चाच करायची नाही. ही भूमिका लोकशाहीमध्ये, सरकारमध्ये ठेवणे हे अतिशय चुकीचे आहे. त्यामुळे सरकारने त्यांना वेळ दिला पाहिजे. ते म्हणाले, ऑक्टोबरमध्ये परतीच्या पावसाने शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले. राजू शेट्टी यांनी उसासंदर्भात आंदोलन केले असताना सरकारने लक्ष घातले नाही. त्यामुळे त्यांना टोकाची भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा दिला आहे.

अजित पवार : राज्यपालांच्या वक्तव्यावर सत्ताधारी गप्प का? पवारांचा सवाल

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल काही लोकांचे वक्तव्य चीड येईल अशाप्रकारचे वक्तव्य होते. राज्यपाल वारंवार असे का बोलतात, का वागतात आणि सत्ताधारी यांच्याबद्दल का गप्प बसतात हे एक महाराष्ट्राला पडलेले कोडे आहे; पण महागाई आणि बेरोजगारीवर कोणीही बोलत नाही. मात्र, नको ते विषय काढून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. डिसेंबरमध्ये विधिमंडळाचे अधिवेशन नागपूरला होत आहे. यासंदर्भात 30 नोव्हेंबरला सर्व गटनेत्यांची बैठक बोलावली आहे. त्यात अधिवेशनाबाबतची रूपरेषा ठरवण्यात येईल, असे पवार यांनी स्पष्ट केले.

प्रकाश आंबेडकरांशी चर्चेची तयारी

समोरच्या पक्षाचा पराभव करण्यासाठी समविचारी पक्षाचे नेते एकत्र येत असतील, तर आपल्याला आनंद आहे. परंतु, यासाठी एका बाजूने तयारी चालत नाही; तर दोन्हींची तयारी हवी. याअगोदरही आम्ही आंबेडकरी चळवळीतील आठवले, गवई, कवाडे यांच्या पक्षांशी चर्चा केली आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांशी आम्ही चर्चा करायला तयार आहोत.

Back to top button