दै. ‘पुढारी’ आयोजित ’राईज अप’ : बॅडमिंटन स्पर्धा, कृतिका घोरपडे, पूर्वा वाडेकर तिसर्‍या फेरीत | पुढारी

दै. ‘पुढारी’ आयोजित ’राईज अप’ : बॅडमिंटन स्पर्धा, कृतिका घोरपडे, पूर्वा वाडेकर तिसर्‍या फेरीत

पुणे; पुढारी वृत्तसेवा : दै. ‘पुढारी’ आयोजित ‘राईज अप’ महिलांच्या बॅडमिंटन स्पर्धेमध्ये सतरा वर्षांखालील गटात कृतिका घोरपडे आणि पूर्वा वाडेकर यांनी प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करीत तिसर्‍या फेरीत प्रवेश केला. दै. ‘पुढारी’ आयोजित या स्पर्धा पी. ई. सोसायटीज मॉडर्न पीडीएमबीए स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, शिवाजीनगर येथे सुरू आहेत. या स्पर्धेचे उद्घाटन दिमाखात झाले. अथर्व हॉस्पिटलचे डॉ. संदीप अग्रवाल यांनी बॅडमिंटन कोर्टची पूजा करून स्पर्धेला सुरुवात केली. स्पर्धेतील उत्साह पाहता त्यांनी अखेर बॅडमिंटनचे रॅकेट हातात घेत आपला खेळ सादर केला. या वेळी दै. ‘पुढारी’चे मार्केटिंग प्रमुख आनंद दत्ता, पुणे विभागाचे मार्केटिंग प्रमुख संतोष धुमाळ, हरीश हिंगणे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

या स्पर्धेच्या सतरा वर्षांखालील गटात कृतिका घोरपडे हिने अपूर्वा मुसळे हिचा 15-10, 15-12 असा 2-0 च्या निसटत्या सेटमध्ये पराभव करीत तिसर्‍या फेरीत प्रवेश केला. दुसर्‍या सामन्यामध्ये पूर्वा वाडेकर हिने प्रणाली डोईफोडेचा 15-6, 15-10 असा पराभव करीत आगेकूच केली. प्रणाली डोईफोडेने पंधरा वर्षांखालील गटात अपूर्वा मुसळेचा 1-15, 18-16, 15-13 असा 2-1 च्या फरकाने पराभव करीत दुसर्‍या फेरीत प्रवेश केला.

महिलांच्या दुहेरी गटामध्ये अदिती काळे आणि प्रचिती वेळापुरे या जोडीने खुशी सुवर्णा आणि निकिता गंधारे या जोडीचा 15-10, 15-7 असा 2-0 च्या फरकाने पराभव करीत पुढच्या फेरीत प्रवेश केला. दुसर्‍या सामन्यामध्ये मृणाल डेंगळे आणि सेजल डेंगळे या जोडीने दिशा पटेल आणि दिव्या जानी या जोडीचा 15-9, 15-10 असा, तर रिद्धी मंगलकर आणि रिद्धी पुडके या जोडीने मृणाल डेंगळे आणि सेजल डेंगळे या जोडीचा 15-4, 15-6 असा एकतर्फी पराभव करीत विजय मिळविला. चौथ्या सामन्यामध्ये खुशी सुवर्णा आणि निकिता गंधारे या जोडीने दिशा पटेल आणि दिव्या जानी या जोडीचा 15-3, 15-1 असा पराभव करीत विजय मिळविला.

पंधरा वर्षांखालील गटामध्ये निकिता गांधी हिने जिया यादव हिचा 15-13, 10-15, 15-09 असा 2-1 फरकाने पराभव केला. दिव्या खरे हिने स्पृहा गाडगीळचा पहिल्या सेटमध्ये 15-0 असा दणदणीत पराभव केला, तर दुसर्‍या सेटमध्ये स्पृहाने जिद्दीने खेळत 15-11 असा केवळ 4 गुणांच्या फरकाने पराभव झाला. मधुरा काकडे हिने प्रज्वलिता जोशी हिचा 15-11, 15-6 असा, पलक मिसाळ हिने तनिष्का हळदणकरचा 15-6, 15-11 असा, अंजली कुलकर्णी हिने इरा आपटे हिचा 15-13, 13-15, 15-11 असा 2-1 च्या फरकाने पराभव करीत विजय मिळविला.

एकोणीस वर्षांखालील गटामध्ये कृतिका घोरपडेने प्रिया शेळकेचा 7-15, 15-12, 15-6 असा पराभव करीत आगेकूच केली. पहिला सेट कृतिका मोठ्या फरकाने पराभूत झाली. परंतु, पुढच्या दोन्ही सेटमध्ये कमबॅक करीत तिने विजय मिळविला. रिधी पुडक्ये हिने सेजल डेंगळे हिचा 15-3, 15-4 असा, प्राची शितोळेने श्रुती महाजन हिचा 15-2, 15-2 असा मोठ्या फरकाने पराभव केला. नेहा गाडगीळने सौरभी खाडे हिचा 15-5, 15-10 असा, अपूर्वा घावटेने मृणाल वाघ हिचा 15-6, 15-4 असा पराभव करीत विजय मिळविला.
सतरा वर्षांखालील गटामध्ये सिया भेंडेने अद्विक जोशीचा 15-13, 15-9 असा, सानवी देखणे हिने निकिता गांधीचा 15-4, 15-1 असा, प्रणिका ठाकरेने प्राची पटवर्धनचा 15-10, 15-8 असा तर मृणाल सोनारने हर्षिता पाटीलचा 15-4, 15-5 असा पराभव करीत
आगेकूच केली.

दै. ‘पुढारी’ने हा उपक्रम चांगला घेतला आहे. फक्त महिलांसाठीच ही स्पर्धा असल्याने त्यांना प्रोत्साहन मिळणार आहे. राष्ट्रीय आणि ऑलिंम्पिक स्पर्धेतून खेळाडू आपल्याला नक्कीच दिसतील. या स्पर्धेत अनेक तरुण खेळाडू सहभागी झालेले असल्याने आगामी पाच वर्षांनंतर या स्पर्धेतून अनेक खेळाडू नक्कीच देशाचे नाव मोठे करण्यात पुढे असतील.

                                                – संदीप अग्रवाल, अथर्व हॉस्पिटल

 

Back to top button