कर्जत : मुलानेच केला जन्मदात्या बापाचा खून ; दोघांना अटक | पुढारी

कर्जत : मुलानेच केला जन्मदात्या बापाचा खून ; दोघांना अटक

कर्जत : पुढारी वृत्तसेवा : पोलिसांत पकडून दिल्याच्या रागातून मुलाने आपल्या जन्मदात्या पित्याचा काठी, दगड, विटांनी पोटावर व पायावर जबर मारहाण करून खून केला. ही घटना कर्जत तालुक्यातील भांबोरा शिवारातील कोरेवस्ती येथे घडली. याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांना सहा दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. सुलाख्या आसम्या चव्हाण (वय 55, रा.कोरेवस्ती, भांबोरा, ता.कर्जत) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा मुलगा नितीन उर्फ आसमानतार्‍या सुलाख्या चव्हाण, अक्काबाई चव्हाण, काळ्या चव्हाण, विशाल चव्हाण या चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. यातील नितीन चव्हाण व अक्काबाई चव्हाण यांचा नान्नज (ता.जामखेड) या ठिकाणी शोध घेऊन अटक करण्यात आले.

त्यांना सहा दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. उर्वरित दोन आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत.
यासंदर्भात खून झालेल्या सुलाख्या चव्हाण यांची सून मालोका राजू चव्हाण (वय 25) हिने फिर्याद दिली आहे. फिर्यादी मालोका चव्हाण ही आपल्या पती, आई, सासू, नणंदेसह कापूस वेचण्यासाठी गेल्या होत्या.  सायंकाळी घरी आल्यानंतर फिर्यादीचा दिर नितीन चव्हाण, त्याची पत्नी व दोन मुले सुलाख्या चव्हाण यांच्या घरासमोर आले. फिर्यादीचा पती राजू व सासरे सुलाख्या यांनी माझा मुलगा समीर याला दौंड (जि.पुणे) येथील पोलिसांत पकडून दिले, असे म्हणत त्याने शिवीगाळ केली. त्यावेळी फिर्यादीच्या पती आणि सासर्‍याने आम्ही तुझ्या मुलाविषयी पोलिसांना काही सांगितले नाही, तू चौकशी कर, असे समजावून सांगितले.

मात्र, त्यानंतर नितीन, त्याची पत्नी व दोन मुलांनी फिर्यादीच्या पतीला व सासर्‍याला लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली. फिर्यादी मध्ये गेली असता तिला दगड फेकून मारला. यावेळी फिर्यादीचे पती व सासरे पळून जाऊ लागले असता नितीन याने दगड फेकून मारला. तो फिर्यादीच्या पतीच्या डोक्यात लागून तो जखमी झाला. त्यानंतर फिर्यादीचे सासरे पळत असताना आरोपीने पाठीमागून डोक्यात काठी मारली. त्यावेळी सासरे सुलाख्या चव्हाण खाली पडले.त्यानंतर चौघांनी डोक्यात, छातीवर पायावर मारहाण केली. मारहाणीत जखमी होऊन सुलाख्या चव्हाण बेशुद्ध पडले. सुलाख्या चव्हाण बेशुद्ध झाल्यावर सर्वजण तेथून निघून गेले.

फिर्यादी मालोका व नातेवाईकांनी सुलाख्या यांना भांबोरा येथील दवाखान्यात नेले. मात्र जास्त मार लागल्याने डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी दौंड येथे नेण्यास सांगितले. परंतु, रात्री अंधार झाल्याने व वाहतुकीची सुविधा उपलब्ध न झाल्याने दुसर्‍या दिवशी सकाळी भिगवण येथील दवाखान्यात नेले व तेथे दोन दिवस उपचार सुरू ठेवले. मात्र, त्यानंतरही बरे न वाटल्याने सुलाख्या यास पुण्याच्या ससून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. चौथ्या दिवशी उपचारादरम्यान त्यांना मयत घोषित केले. त्यानंतर मालोका राजू चव्हाण हिच्या फिर्यादीवरून चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. यातील दोघांना अटक करण्यात आली आहे.  ही कारवाई पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलिस निरीक्षक सतीश गावित, उपनिरीक्षक अनंत सालगुडे, कर्मचारी अंकुश ढवळे, पांडुरंग भांडवलकर, श्याम जाधव, गोवर्धन कदम, शकील बेग, राणी व्यवहारे आदींनी केली.

Back to top button