Russia Ukraine War : स्फोटानंतर आण्विक केंद्राला मोठा धोका | पुढारी

Russia Ukraine War : स्फोटानंतर आण्विक केंद्राला मोठा धोका

कीव्ह; पुढारी ऑनलाईन : युक्रेनच्या झापोरिझिया अणु प्रकल्पावर रविवारी पुन्हा एकदा रशियाने बॉम्ब हल्ले केले. या हल्ल्याने युरोपमधील सर्वात मोठे आण्विक केंद्र धोक्यात आले आहे. यामुळे पुन्हा महायुद्धाचे ढग आणखी गडद होण्याची शक्यता दाटू लागली आहे. दरम्यान युरोपातील हा सर्वात मोठा आण्विक प्रकल्प रशियन सैन्याच्या ताब्यात आहे. या हल्ल्यानंतर दोन्ही देशांनी एकमेकांवर आरोप केले आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाच्या आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेने (IAEA) दोन्ही देशांना आगीशी खेळू नये, असा इशारा दिला आहे. अणु प्रकल्पावर असा हल्ला केव्हाही भीषण आण्विक आपत्तीला कारणीभूत ठरू शकतो, असे सांगण्यात आले आहे. (Russia Ukraine War)

संयुक्त राष्ट्रसंघाचा इशारा (Russia Ukraine War)

शनिवारी संध्याकाळी उशिरा आणि रविवारी सकाळी एकूण १२ बॉम्ब अणु प्रकल्प संकुलावर पडले. प्लांटमध्ये उपस्थित असलेल्या IAEA टीमने तातडीने संयुक्त राष्ट्राला माहिती दिली. गोळीबारात प्लांटमधील अनेक इमारतींचे नुकसान झाल्याची माहिती टीमने दिली. मात्र अणुभट्टीचा परिसर सुरक्षित आहे. IAEA प्रमुख राफेल ग्रोसी यांनी म्हटले आहे, की अणु प्रकल्प संकुलावर बॉम्बहल्ले करणे अस्वीकार्य आहे. हे त्वरित थांबवावे. याबाबत तुम्हाला यापूर्वीही इशारा देण्यात आला आहे. हे आगीशी खेळण्यासारखे कृत्य आहे ज्यात प्रत्येकाचे नुकसान होईल. IAEA च्या इशाऱ्यानंतर रशिया आणि युक्रेनने बॉम्बहल्ल्यासाठी एकमेकांवर आरोप केले आहेत.

तर अणुदुर्घटना टाळणे कठीण

हे लक्षात घेण्यासारखे आहे की युद्धापूर्वी, या सोव्हिएत काळातील प्लांटमधून युक्रेनच्या वीज गरजांपैकी 20 टक्के उत्पादन केले जात होते. गेल्या अनेक आठवड्यांपासून या प्रकल्पातून होणारी वीजनिर्मिती बंद आहे. बाहेरून वीज घेऊन किंवा जनरेटरमधून वीजनिर्मिती करून अणुभट्ट्या थंड ठेवल्या जात आहेत. अशा परिस्थितीत बॉम्बहल्ल्यांमुळे प्लांटला आग लागली तर अणुदुर्घटना टाळणे कठीण  होणार आहे. (Russia Ukraine War)


अधिक वाचा :

Back to top button