उंडवडी : साळुंके वस्तीवरील रोहित्र बंदमुळे शेतकर्‍यांचे हाल | पुढारी

उंडवडी : साळुंके वस्तीवरील रोहित्र बंदमुळे शेतकर्‍यांचे हाल

उंडवडी; पुढारी वृत्तसेवा : गाडीखेल (ता. बारामती) येथील धायतोंडे व साळुंके वस्तीवरील विद्युत रोहित्र दोन ते तीन महिन्यांपासून जळाले असल्याने येथील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचे हाल होत आहेत. रब्बी हंगाम सुरू झाला असून पिकांना पाणी देण्याचे काम चालू आहे. परंतु विजेअभावी पिकांना पाणी देता येत नसल्यामुळे शेतकरी हळहळ व्यक्त करत आहेत.

हा जिरायती भाग असल्यामुळे या भागातील पिकेही आठ महिने, तेही पाऊस वेळेवर पडला तर. परंतु चालू वर्षी पाऊस भरपूर झाला, त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांना पाणी मुबलक आहे. परंतु पाऊस भरपूर पडूनही रोहित्र बंदमुळे येथील शेतकर्‍यांना पिण्याचे पाण्यासाठी व शेतीच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. या रोहित्रावर वर भरपूर जोड असल्याने प्रमाणापेक्षा जास्त दाब असल्याने रोहित्र वारंवार जळत आहे. परिणामी याचा शेतकर्‍यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

आम्ही वारंवार महावितरण अधिकार्‍यांशी विद्युत रोहित्र लवकर बसवा, अशी तक्रार करत आहोत. मात्र महावितरणचे अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. लवकरात लवकर रोहित्र बसवण्यात यावे. पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर होत चालला आहे. पाणी असून पिकांना पाणी देता येत नाही. प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करावी.

                                                            – दिलीप साळुंखे, शेतकरी गाडीखेल

Back to top button