पुणे : अकरावीला घ्या आजच प्रवेश; प्रवेशफेरीचा शेवटचा दिवस | पुढारी

पुणे : अकरावीला घ्या आजच प्रवेश; प्रवेशफेरीचा शेवटचा दिवस

पुणे; पुढारी वृत्तसेवा : अकरावी प्रवेशापासून वंचित विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळावी यासाठी 12 ते 19 नोव्हेंबरदरम्यान अखेरची प्रवेश फेरी राबवण्यात येत आहे. त्यानुसार प्रवेशाचा शनिवार (दि.19) अंतिम दिवस आहे. अजूनही 32 हजार 960 जागा रिक्त असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रतिसाद नसताना देखील प्रवेशासाठी वारंवार मुदतवाढ का देण्यात येते असा प्रश्न निर्माण झाला आहे. पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर आणि मुंबई महानगर क्षेत्रात अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशासाठी सात फेर्‍या राबवूनही काही विद्यार्थ्यांना अकरावीला प्रवेश मिळाला नसल्याचे उघडकीस आले होते.

त्यामुळे अन्य अभ्यासक्रमांना प्रवेश न मिळाल्याने अकरावीला प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी देण्यासाठी 12 ते 19 नोव्हेंबरदरम्यान फेरी राबविण्याचा निर्णय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक कृष्णकुमार पाटील यांनी जाहीर केला होता. त्यानुसार कार्यवाहीचे टप्पे संचालनालयाने संकेतस्थळावर जाहीर केले होते. त्यामुळे 19 नोव्हेंबर नंतर 2022-23 मधील प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार की, प्रवेशासाठी आणखी मुदतवाढ दिली जाणार याकडे शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

अकरावी प्रवेश प्रक्रिया दृष्टिक्षेपात
एकूण महाविद्यालये- 319
एकूण प्रवेशक्षमता – 111990
एकूण नोंदणी – 108031
कोटा प्रवेशक्षमता – 15506
कोटांतर्गत प्रवेश – 10180
कॅप प्रवेशक्षमता – 10232
कॅपअंतर्गत अर्ज -76049
एकूण प्रवेश – 79030
रिक्त जागा – 32960

Back to top button