कोल्हापूर : वाहने रोखली, जेवणही दिले; ‘स्वाभिमानी’ कार्यकर्त्यांनी जपली माणुसकी | पुढारी

कोल्हापूर : वाहने रोखली, जेवणही दिले; 'स्वाभिमानी' कार्यकर्त्यांनी जपली माणुसकी

हमीदवाडा: पुढारी वृत्तसेवा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊसतोड बंद आंदोलनामध्ये कागल तालुक्यातील लिंगनूर- कापशी येथील कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. या कार्यकर्त्यांनी येथील महत्त्वाच्या अशा नाक्यावर ऊस भरून जाणारी शंभरभर वाहने अडवली. मात्र, त्याचवेळी या वाहनांमधील ड्रायव्हर व क्लीनर यांची उपासमार होऊ नये, म्हणून त्यांना जेवण देखील करून वाढले. स्वाभिमानीच्या  कार्यकर्त्यांनी आंदोलनामध्येही जपलेल्या या माणुसकीची पंचक्रोशीत चर्चा होत आहे.

गतवर्षी तुटलेल्या उसाला एफआरपी अधिक दोनशे रुपये मिळावेत. तसेच एफआरपीचे तुकडे करणारा कायदा रद्द करावा, अशा प्रमुख मागण्यांसाठी गुरूवारपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ऊसतोड बंद आंदोलन सुरू आहे. कागल तालुक्यातील गावोगावी संघटनेचे कार्यकर्त्यांनी ऊसतोडी बंद पाडल्या.

सीमा भागातून कर्नाटकातून आल्यानंतर लिंगनूर कापशी हे एक महत्त्वाचे ठिकाण आहे. येथे मुरगूड पोलीस स्टेशनची चौकी देखील आहे. याच चौकीच्या ठिकाणी नाक्यावर लिंगनूर- कापशी येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उसाची वाहने अडवून धरली. ही वाहने जवळपास शंभरभर होती. उसाची वाहने सोडून अन्य वाहने त्याचवेळी जाऊ देण्यात आली. मात्र, ऊस वाहने शुक्रवारी सायंकाळपर्यंत अडविण्यात आली होती. ही वाहने अडवल्यानंतर यातील वाहनांमध्ये असणाऱ्या ड्रायव्हर व क्लिनर यांची काळजी घेत त्यांची उपासमार होऊ नये, म्हणून १५० जणांना जेवण करून वाढले.

लिंगनूर येथील एसटी स्टँडवर हे जेवण करून हॉटेलमध्ये वाढण्यात आले. दरम्यान कारखान्यांनी अधिक वाट न पाहता संघटनेच्या मागण्या मान्य कराव्यात, असे यावेळी संघटनेचे कार्यकर्ते संभाजी यादव यांनी सांगितले. या आंदोलनात महादेव कामते, संभाजीराव यादव, उत्तम बांबरे, उत्तम आवळेकर, भाऊसो जिनगे, रमेश मगदूम, तात्यासो पाटील, राकेश पाटील, शिवाजी कमळकर, पंडीत पाटील, पांडुरंग चौगले आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

हेही वाचलंत का ? 

Back to top button