कोल्हापूर : ऊस वाहतूक वाहनांना दिवसा शहरात प्रवेश बंद | पुढारी

कोल्हापूर : ऊस वाहतूक वाहनांना दिवसा शहरात प्रवेश बंद

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : साखर कारखान्यांच्या गळीत हंगामामुळे जिल्ह्यातून व इतर ठिकाणांहून ऊस वाहतूक सुरू आहे. ऊस वाहतुकीसाठी वापरण्यात येणारे ट्रक, ट्रॅक्टर-ट्रॉली, बैलगाडा शहरातून जात असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. तसेच ही वाहतूक सुरक्षित व्हावी यासाठी दिवसा या वाहनांना शहरात प्रवेश बंद करण्यात आला आहे. ऊस वाहतूकदारांनी रात्री 12 ते पहाटे 6 या वेळेतच उसाची ने-आण करावी, असे आवाहन शहर वाहतूक शाखेच्या वतीने करण्यात आले. तसेच त्यासाठी पर्यायी मार्गही देण्यात आले आहेत.
राजाराम कारखान्याकडे जाणारी वाहने तावडे हॉटेलकडून ताराराणी पुतळा, सदर बाजार, धैर्यप्रसाद हॉल चौक, पोलिस अधीक्षक कार्यालय, कसबा बावडा मेन रोडवरून पुढे जातील. बालिंगामार्गे येणारी वाहने फुलेवाडी, रंकाळा टॉवर, रंकाळा स्टँड, गंगावेस, शिवाजी पूल, सी. पी. आर. सिग्नल चौक, महावीर कॉलेजमार्गे कसबा बावड्याकडे जातील. भोगावतीकडून येणारी वाहने नवीन वाशी नाका, रिंग रोड, संभाजीनगर रिंगरोड, सायबर चौक, टेंबलाई उड्डाण पूल, ताराराणी पुतळा, सदर बाजार, धैर्यप्रसाद हॉल, पोलिस अधीक्षक कार्यालयमार्गे कसबा बावडा राजाराम कारखान्याकडे मार्गस्थ होतील.

डी. वाय. पाटील कारखाना व कुडित्रे कारखान्याकडे जाणारी वाहने तावडे हॉटेलकडून ताराराणी पुतळा, सदर बाजार, धैर्यप्रसाद हॉल, महावीर कॉलेज, सीपीआर सिग्नल चौक, शिवाजी पूल, गंगावेस, रंकाळा टॉवर फुलेवाडीमार्गे गगनबावडा रोडकडे जातील.

तावडे हॉटेलकडून ताराराणी पुतळा, टेंबलाई उड्डाण पूल हायवे, सायबर चौक, संभाजीनगर, कळंबामार्गे बिद्री कारखान्याकडे मार्गस्थ होतील. भोगावती कारखान्याकडे जाणार्‍या वाहनांनी तावडे हॉटेल, ताराराणी पुतळा, टेंबलाई उड्डाणपूल, सायबर चौक, संभाजीनगर, कळंबा साई मंदिर, रिंग रोड, नवीन वाशी नाकामार्गे पुढे जावे. दत्त दालमिया कारखान्याकडे जाणारी वाहने तावडे हॉटेलकडून ताराराणी पुतळा, धैर्यप्रसाद हॉल, महावीर कॉलेज, सीपीआर सिग्नल चौक, शिवाजी पूलमार्गे दत्त दालमिया कारखान्याकडे मार्गस्थ होतील.

Back to top button