विनाअनुदानित शिक्षकांना अनुदानाचा 20 टक्के टप्पा – दीपक केसरकर | पुढारी

विनाअनुदानित शिक्षकांना अनुदानाचा 20 टक्के टप्पा - दीपक केसरकर

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  राज्यातील विनाअनुदानित व अंशतः अनुदानित शिक्षक तसेच अघोषित शाळांतील शिक्षकांना अनुदानाचा 20 टक्के टप्पा देण्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी गुरुवारी केली. या घोषणेचा 60 हजार शिक्षकांना लाभ होणार आहे.

केसरकर म्हणाले की, शिक्षकांची गेली 13 ते 14 वर्षे ही मागणी प्रलंबित होती. आता आम्ही ती पूर्ण करण्याचा निर्णय केला आहे. मंत्रीमंडळाने 20 टक्के अनुदान वाढीच्या टप्प्यास गुरुवारी तत्वत: मंजुरी दिली आहे. ज्या शाळा 20 टक्के अनुदानावर होत्या, त्यांना 40 टक्के, ज्या 40 टक्केवर होत्या त्यांना 60 टक्के तर ज्या शाळा 60 टक्के अनुदानावर होत्या त्यांना आता 80 टक्के अनुदान प्राप्त होणार आहे. 20 टक्के अनुदानाचा लाभ दिल्यामुळे वर्षाला राज्यावर 1 हजार 160 कोटीचा बोजा येणार आहे, असे केसरकर यांनी सांगितले.

ज्या शाळा अघोषित होत्या, त्यांनी मान्यतेसंदर्भातल्या अटी पूर्ण केल्या नव्हत्या, त्या शाळांतील शिक्षकांनासुद्धा 20 टक्के अनुदानाचा लाभ होईल. या सर्व शाळांची आम्ही वर्गवारी केली आहे, पहिल्या गटात 387, दुसर्‍या गटात 284, तिसर्‍या गटात 1 हजार 711 आणि चौथ्या गटात 2 हजार 154 शाळा आहेत. हा निर्णय मंत्रीमंडळासमोर येऊ शकला नाही. मात्र लवकरच तो मंत्रीमंडळापुढे जाईल, असे केसरकर यांनी सांगितले.

Back to top button