नगर जिल्ह्यात रब्बीची 32 टक्के पेरणी | पुढारी

नगर जिल्ह्यात रब्बीची 32 टक्के पेरणी

नगर : पुढारी वृत्तसेवा :  यंदाच्या रब्बी हंगामाने चांगलीच गती घेतली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 77 हजार हेक्टरवर 32 टक्के पेरणी पूर्ण झाली असून, यामध्ये हरभरा आणि गहू क्षेत्राची आकडेवारी वाढतीच असल्याचे चित्र आहे. दरम्यान, यंदा ज्वारीचे क्षेत्र मात्र तब्बल 50 टक्के घटले असून, याऐवजी गहू, हरभरा व अन्य पिकांचे क्षेत्र वाढणार आहे. जिल्ह्यात रब्बीचे सरासरी 5 लाख 33 हजार हेक्टर क्षेत्र आहे. यंदा चांगला पाऊस झाल्याने धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा आहे.

ओढे, नालेही वाहिल्याने पाण्याची पातळीही वाढली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना रब्बीची चिंता नाही. शेतकर्‍यांनी खरीपानंतर लगबगीने रब्बीची तयारी केली आहे. त्यासाठी आवश्यक मशागत, खते-बियाणे यांचीही तरतूद केलेली आहे. त्यामुळे यावर्षी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासूनच पेरण्यांनी चांगलीच गती घेतल्याचे चित्र आहे. यामध्ये हरभरा पेरणी डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. तर गहू पेरणीसाठी 15 डिसेंबरपर्यंत अधिक पोषक वातावरण असणार आहे.

ज्वारीचे 65 टक्के क्षेत्र घटले
दरवर्षी ज्वारीचे 2 लाख 67 हजार 834 हेक्टर क्षेत्र सरासरी आहे. मात्र, यावर्षी पाऊस नोव्हेंबरपर्यंत सुरू होता. परतीच्या पावसाने तर हाहाकार उडवला. त्यामुळे वापसा नसल्याने ज्वारीचे क्षेत्र यावर्षी तब्बल 65 टक्क्यांनी घटले आहे. त्यामुळे यंदा केवळ 96 हजार 386 हेक्टरवरच ज्वारीची पेरणी झाल्याची माहिती कृषी विभागाकडून समजली.

कपाशी काढून गहू पेरण्या वाढणार

सध्या कपाशीची पिके मोठ्या प्रमाणात उभी आहेत. काही भागात शेवटची वेचणी सुरू आहे. तर काही ठिकाणी दुसरी वेचणी आहे. मात्र, शेवटची वेचणी झाल्यानंतर शेतकरी त्या ठिकाणी गहू पेरणीसाठी नियोजन करत आहेत. साधारणतः डिसेंबरमध्ये शेवटची वेचणी करायची आणि शेवटचा आठवडा किंवा जानेवारीत पहिल्या आठवड्यात गहू पेरायचा, याबाबत शेतकरी तयारी करत आहे.

Back to top button