राजस्थानी गोपालक चाराटंचाईने हतबल! आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील स्थिती | पुढारी

राजस्थानी गोपालक चाराटंचाईने हतबल! आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील स्थिती

पारगाव, पुढारी वृत्तसेवा: अतिपावसामुळे निर्माण झालेल्या चाराटंचाईमुळे आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात राजस्थानी गोपालक अक्षरश: हतबल झाले आहेत. गीर गायींना खायला चारा कुठेही शिल्लक नसल्याने आतापासूनच भटकंती करण्याची वेळ गोपालकांवर आली आहे. ऊसतोडणी झालेल्या शेतामध्ये फिरून उसाची वाळलेली टिपरे गोळा करून ती गायींना खाऊ घालताना गोपालक दिसत आहेत.

तालुक्याच्या पूर्व भागात थोरांदळे, रांजणी, पारगाव आदी गावांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून परप्रांतीय राजस्थानी गोपालक वास्तव्यास आहेत. त्यांच्याकडे शेकडो राजस्थानी गीर गायी आहेत. यंदा पडलेल्या अतिपावसामुळे डोंगर माळरानावरील चारा सडून नष्ट झाला. आतापासूनच चाराटंचाई निर्माण झाली आहे. राजस्थानी गोपालक हे याच परिसरात राहून दुग्धव्यवसाय करतात. परंतु, आता गायींना खायला हिरवा चारा मिळत नसल्याने दूध उत्पादनात घट झाल्याचे राजस्थानी गोपालक सांगत आहेत. सध्या कोठेही चारा शिल्लक नाही. राजस्थानी गोपालकांना गायींना घेऊन दूरवर डोंगर माळरानावर जावे लागते.

सर्वत्र चाराटंचाई निर्माण झाल्याने चारा विकत देखील मिळत नाही. राजस्थानी गोपालक आता ऊसतोडणी झालेल्या शेतामध्ये भल्या सकाळी जाऊन वाळून गेलेली उसाची टिपरे, हिरवे पाचट गोळा करून ते गायींसाठी चारा म्हणून घेऊन जाताना दिसत आहेत. यंदा उन्हाळ्यात निर्माण होणारी चाराटंचाई हिवाळ्यातच निर्माण झाल्याने पुढील उन्हाळ्याचे दिवस हे अतिशय कठीण असणार असल्याचे राजस्थानी गोपालक सांगत आहेत.

Back to top button