आव्हाड यांनी विनयभंग केला नाही; सत्ताधाऱ्यांकडून कलमांचा वापर राजकीय टूल प्रमाणे : जयंत पाटील | पुढारी

आव्हाड यांनी विनयभंग केला नाही; सत्ताधाऱ्यांकडून कलमांचा वापर राजकीय टूल प्रमाणे : जयंत पाटील

पुढारी ऑनलाईन डेस्क : जितेंद्र आव्हाड यांनी विनयभंग केलेला नाही. त्यांना जाणीवपूर्वक टार्गेट केले जात आहे. ठाण्यात पोलिसांचा गैरवापर चालू आहे. आव्हाडांना अडचणीत आणण्याचा निर्धार केल्याच दिसत आहे. कलमांचा वापर राजकीय टूल म्हणून सत्ताधारी पक्ष वापरत असेल तर ही गंभीर बाब आहे. अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घालणे गरजेचे असल्याचेही पाटील यांनी म्हटले आहे. ठाणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी पाटील म्हणाले की, खालच्या स्तराचे आरोप झाल्याने आव्हाड व्यथित झाले आहेत. ज्या महिलेला बहीण म्हटंलं त्यांच्याबाबत असं करणं शक्य नाही. आव्हाडांनी विनयभंग केलेला नाही. कायद्याची मोडतोड करून एखाद्याला गुन्हेगार ठरविण्याचं काम जाणीवपूर्वक होत आहे. महाराष्ट्रात कायदा आणि सुरक्षा याबाबतीत पोलिस विभाग कसा चालतो ते गृहविभागाने पाहिले पाहिजे. मुख्यमंत्र्याच्या डोळ्यासमोर घडलेला प्रकार आहे. त्यामुळे त्यांनी याबाबत असं काही घडलं नाही हे सांगितलं पाहिजे. विनयभंगात याच्यातील कोणता प्रकार बसतो हे पोलिसांनी स्पष्ट सांगावे. याचा आम्ही सरकारला जाब विचारू, पण पोलिस जर असे वागत असतील तर पोलिसांनाही याचे उत्तर द्यावे लागेल, असे ते म्हणाले.

आव्हाडांची कृती विनयभंगाच्या व्याख्येत बसत नाही. तरीही जाणीवपूर्वक एखाद्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करणे हा कायद्याचा चुकीचा वापर आहे. शिवाजी महाराजांच्या इतिहासाची मोडतोड करून चुकीचा इतिहास दाखविण्याचा प्रयत्न केला, या विरोधात त्यांनी भूमिका घेतली. याला राष्ट्रवादीचेही समर्थन आहे. आव्हाड यांनी विधानसभा अध्यक्षांच्या नावाने राजीनामा दिलेला आहे. पण याबाबतीत त्यांनी राजीनामा देऊ नये, अशी राष्ट्रवादीची भूमिका आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत चर्चा करून निर्णय घेतला जाईल.

खुनाचा गुन्हा चालला असता पण विनयभंगाचा नाही : जितेंद्र आव्हाड

चित्रपटाला विरोध केल्याने टार्गेट केले जात आहे. माझ्याविरोधात षडयंत्राचा हा भाग आहे. विनयभंगासारखा गुन्हा आयुष्यात केला नाही. इतक्या खालच्या पातळीवरचं राजकारणं मान्य नाही. माझ्या हत्येच प्लॅनिंग झालं असत तरी चाललं असतं पण माझ्यावर लावलेल्या कलमाबाबत वाईट वाटतं. ३५४ कलमाअंतर्गत दाखल गुन्हा मान्य नसल्याने मी आमदारकीचा राजीनामा देत आहे. राजकारण करावे पण सूडबुद्धीने राजकारण करू नये, अशी भूमिका आव्हाड यांनी मांडली आहे.

हेही वाचा :

Back to top button