पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात एकूण 588 रूग्णालये आहेत. खासगीसह सरकारी व महापालिका रूग्णालयांना पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे नोंदणी करून परवानगी घ्यावी लागते. तसेच, दर तीन वर्षांनी नूतनीकरण करावे लागते. ती पद्धत ऑफलाइन आहे. त्यामुळे रूग्णालयत व्यवस्थापनाची दमछाक होते. तसेच, त्यात बराच वेळ वाया जातो. त्यावर तोडगा म्हणून ती पद्धत ऑनलाइन करण्यात येणार आहे.
खासगी, सरकारी व महापालिका रूग्णालयांना नोंदणी व परवाना नूतनीकरणासाठी पालिकेच्या वैद्यकीय विभागाकडे हेलपाटे मारावे लागतात. तसेच, काही खासगी व शासकीय रूग्णालये या प्रक्रियेस प्रतिसाद देत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे त्या रूग्णालयांचे परवाना नूतनीकरण प्रलंबित राहते. अशा रूग्णालयांना पालिकेकडून कारणे दाखवा नोटीसा बजावल्या जातात. त्यालाही प्रतिसाद न दिल्यास दंडात्मक कारवाई केली जाते. प्रसंगी फौजदारी गुन्हे दाखल केले जातात.
नोंदणी व नूतनीकरणाची ही संपूर्ण प्रक्रिया बरीच वेळखाऊ आहे. त्यामुळे रूग्णालयांना तसेच, वैद्यकीय विभागास बराच मनस्ताप सहन करावा लागतो. त्यावर तोडगा म्हणून राज्य शासनाने त्यासाठी एकाच प्रकारची संगणक प्रणाली विकसित केली आहे. ती प्रणाली लवकरच संपूर्ण राज्यात लागू केली जाणार आहे. त्यामुळे रूग्णालयाची नोंदणी व परवाना नूतनीकरण ऑनलाइन माध्यमातून सुलभपणे करता येणार आहे.
शहरातील खासगी, शासकीय व महापालिका रूग्णालयांना महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून नोंदणी व नूतनीकरण परवाना दिला जातो. सध्या 47 रूग्णालयांचे नूतनीकरण प्रलंबित होते. त्यातील 20 रूग्णालयाचे कामकाज पूर्ण झाले असून, उर्वरित रूग्णालयांना आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देण्याची सूचना करण्यात आली आहे, असे महापालिकेचे सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी सांगितले.