साऊथच्या ‘या’ स्टारला चालत्या कारच्या छतावर बसून स्टंट करणं पडलं महागात, गुन्हा दाखल | पुढारी

साऊथच्या ‘या’ स्टारला चालत्या कारच्या छतावर बसून स्टंट करणं पडलं महागात, गुन्हा दाखल

पुढारी ऑनलाईन डेस्क : तेलगु चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते आणि राजकारणी पवन कल्याण एका रॅलीदरम्यान कार स्टंट केल्यानंतर अडचणीत सापडले आहेत. हैदराबाद पोलिसांनी शनिवारी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून बेदरकारपणे गाडी चालवणे, इतरांच्या जीवाला आणि वैयक्तिक सुरक्षेला धोका निर्माण केल्याचा आरोप केला आहे. गेल्या आठवड्यात, पवन कल्याण यांचा एक व्हिडिओ समोर आला होता ज्यामध्ये ते एका वेगवान कारच्या छतावर बसलेले दिसत होते. हा व्हिडिओ सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. त्यानंतर शनिवारी त्यांच्या विरोधात पोलिसात तक्रार करण्यात आली.

अभिनेते पवन कल्याण हे जनसेना पार्टीचे सर्वोच्च नेते आहेत. पी शिव कुमार नावाच्या एका व्यक्तीने पवन कल्याण यांच्यावर रॅश ड्रायव्हिंगचा आरोप केला आहे. त्यांनीच एफआयआर दाखल केली आहे. पवन कल्याण यांच्या भरधाव कारने आपले नुकसान झाल्याचे शिवकुमार यांनी सांगितले असून ‘पवन कल्याण यांच्या कार रॅली दरम्यान माझा अपघात झाला. मोटारसायकलवर नियंत्रण ठेवता न आल्याने मी रस्त्यावर पडलो.’ असे त्यांनी एफआयआरमध्ये म्हटले आहे. आपल्य तक्रारीत शिव कुमार यांनी पवन कल्याण आणि त्यांच्या गाडीचा चालक तसेच त्यांच्या रॅलीत पाठीमागून येणाऱ्या इतर गाड्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

एफआयआरमध्ये असेही म्हटले आहे की, पवन कल्याण गाडीच्या टपावर बसले असतानाही चालकाने भरधाव वेगात आणि निष्काळजीपणाने वाहन चालवले. इतर वाहनेही त्यांच्या गाडीच्या मागे वेगात जात होती. यावेळी रस्ता सुरक्षा नियमांचे उल्लंघन करण्यात आले. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यामध्ये पवन कल्याण चालत्या कारच्या छतावर बसून स्टंट करताना दिसत आहेत.

पवण कल्याण हे आंध्र प्रदेशातील इप्पटम गावात लोकांना भेटण्यासाठी जात होते. यादरम्यान त्यांच्या ताफ्यामागे अनेक वाहने होती. रस्ता रुंदीकरणामुळे ज्यांची घरे उद्ध्वस्त झाली, अशा लोकांना ते भेटायला जात होते. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. कल्याण यांनी इप्पटम गावात फिल्मी स्टाईलमध्ये प्रवेश केला होता.

Back to top button