यवतमाळ : मंत्री संजय राठोड यांच्याबाबत प्रश्न विचारताच पत्रकारावर भडकल्या चित्रा वाघ | पुढारी

यवतमाळ : मंत्री संजय राठोड यांच्याबाबत प्रश्न विचारताच पत्रकारावर भडकल्या चित्रा वाघ

यवतमाळ; पुढारी वृत्तसेवा : भाजपच्यावतीने शुक्रवारी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी पत्रकारांनी मंत्री संजय राठोड यांच्याबाबत प्रश्न विचारताच भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाअध्यक्षा चित्रा वाघ संतापल्या. संजय राठोड यांचा विषय संपला आहे, असे तुम्ही म्हणता, मग आघाडी सरकारच्या काळात केवळ राजकीय हेतूने तुम्ही त्यांच्यावर आरोप केले का, असे विचारताच चित्रा वाघ भडकल्या. मला प्रश्न विचारता तुम्ही न्यायालय आहात की न्यायाधीश, मी पाहीन काय करायचे ते, माझी लढाई सुरू आहे, मला शिकवू नका, असल्या पत्रकारांना यापुढे पत्रकार परिषदेला बोलावू नका, असे म्हणत चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद सोडली.

भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा पदाचा चित्रा वाघ यांनी पदभार स्वीकारला. शुक्रवारी त्या यवतमाळात आल्या होत्या. येथील विश्रामगृहावर त्यांनी पत्रपरिषद बोलावली होती. यावेळी सुरुवातीला त्यांनी भाजप महिला मोर्चा महिला संघटन, महिलांचे सक्षमीकरण व महिलांविषयक शासकीय योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्यासाठी काम करणार असल्याचे सांगितले. तसेच शिंदे-फडणवीस सरकारच्या काळातील निर्णयांची माहिती दिली. महाविकास आघाडी सरकारच्या धोरणांवर टीका करत उद्धव ठाकरेंनाही टार्गेट केले.

यावेळी पत्रकारांनी मंत्री संजय राठोड व पूजा चव्हाण या संदर्भात वाघ यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल विचारणा केली. पत्रकारांनी प्रश्न विचारता वाघ यांचा पारा चढला. त्यांनी संजय राठोड विरोधातील लढाई न्यायालयात सुरू असल्याचे सांगितले. यावर पत्रकारांनी राठोड यांचा राजीनामा मागण्यासाठी आपण लढा दिला, ती भूमिका राजकीय होती, तेव्हा संजय राठोड आरोपी होते, आता त्यांना क्लिनचीट मिळाली का, असा प्रश्न करताच वाघ आणखीच भडकल्या. संजय राठोड यांचा कार्यकर्ता म्हणून विरोध कायम आहे. पूजा चव्हाण प्रकरणात संजय राठोडच गुन्हेगार आहे, असे चित्रा वाघ यांनी सांगितले.

यावर आता राठोड यांच्या विषयाकडे आपण कानाडोळा करीत आहात, ते आघाडी सरकारमध्ये असताना आपण यांच्यावर केलेले आरोप खोटे होते का? आपण त्यांचे राजकीय करिअर धोक्यात आणले, असा प्रश्न केला असता, चित्रा वाघ म्हणाल्या, संजय राठोड विरोधात मी एकटीनेच लढा उभारला आहे. या प्रकरणात न्यायालयात जनहित याचिकाही दाखल केली आहे. या प्रकरणामुळे मला मागील वर्षभरात काय-काय सोसावे लागले, याची आपण कल्पनाही करू शकत नाही. संजय राठोड यांना क्लीनचिट दिली गेली असे म्हटले जाते, ही क्लीनचीट आघाडी सरकारच्या काळात दिली आहे. त्यामुळे संजय राठोड यांच्या संदर्भातील प्रश्न तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना विचारले पाहिजे. मात्र तुम्ही एका महिलेला या प्रश्नावरून घेरत आहात, तुम्हाला लाज वाटत नाही का, असे वाघ म्हणाल्या.

यावेळी पत्रकार आणि चित्रा वाघ यांच्यात खडाजंगी झाली. त्यानंतर चित्रा वाघ यांनी पत्रकारांवर तुम्ही सुपारी घेवून प्रश्न विचारात आहात, असा आरोप केला. अशा पत्रकारांना यापुढे माझ्या पत्रकार परिषदेला बोलावू नका असे सांगत, त्यांनी पत्रकार परिषद सोडली. यावेळी त्यांच्यासोबत माजी मंत्री अशोक उईके, आमदार संजीव रेड्डी बोदकूरवार, आमदार नीलय नाईक, भाजप जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा होते.

हेही वाचा :

Back to top button