नागपूर: बेपत्ता बाळाचा पोलिसांनी लावला ५ तासांत छडा | पुढारी

नागपूर: बेपत्ता बाळाचा पोलिसांनी लावला ५ तासांत छडा

नागपूर: पुढारी वृत्तसेवा: घरात खेळणारे बाळ अचानक बेपत्ता झाले. साहजिकच जवळचे कुणी बाळाला खेळवण्यासाठी इकडे-तिकडे घेऊन गेले असावे, असा काहीवेळ आई-वडिलांचा समज झाला. दिवसभर बरीच शोधाशोध झाली पण, चिमुकल्याचा कुठेही थांगपत्ता लागत नव्हता. अखेरीस वडिलांनी रात्री कळमना पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. शेजाऱ्यावर संशय व्यक्त केला. पोलिसांनीही लगेच घटनेचे गांभीर्य लक्षात घेता तपासचक्र वेगात फिरविली आणि केवळ पाच तासांमध्ये या बाळाच्या अपहरणाचा छडा लावला.

आरोपीकडून बाळाला ताब्यात घेत आईच्या स्वाधीन केले. काही दिवसांपूर्वी मुंबईच्या नायर रूग्णालयातून चोरीला गेलेल्या पाच दिवसांच्या बाळाचा मुंबई पोलिसांनी असाच पाच तासात छडा लावत बाळाला आईकडे सोपविले होते. अर्थातच नागपूरच्या या घटनेमुळे मुंबईच्या घटनेला उजाळा मिळाला.

जितेंद्र निशाद असे या आठ महिन्यांच्या अपहृत बाळाचे नाव आहे. त्याचे आई-वडील कळमना हद्दीत राहतात. शेजाऱ्यानेच त्यांच्या घरून या मुलाचे अपहरण केले. हा मुलगा दुपारपासून घरी नसल्याने आई -वडिलांनी दिवसभर मित्र, नातेवाईकांकडे शोधाशोध केली. मात्र, मुलगा आढळून न आल्याने प्रकरण पोलिसांत गेले. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन कळमना पोलिसांसोबतच यशोधरा पोलिसांनीही शोध सुरू केला. पोलीस आयुक्तांसह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत तपासाच्या आवश्यक सूचना केल्या. नागपूर पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक होत असून या आरोपीसंदर्भातही अधिकची माहिती गोळा केली जात आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button