नागपूर : मृतकांची पेन्शन वळवत लाखोंचा घोटाळा करणारी महिला कर्मचारी निलंबित; सर्व खाती गोठवली | पुढारी

नागपूर : मृतकांची पेन्शन वळवत लाखोंचा घोटाळा करणारी महिला कर्मचारी निलंबित; सर्व खाती गोठवली

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषदेतील नेवारे नामक कनिष्ठ महिला लिपिक कर्मचाऱ्याने मृतकांच्या नावाची पेन्शन ज्या जवळच्या मंडळींच्या बँक खात्यात वळती केली, ती सर्व खाती अखेर गोठविण्यात आली आहेत. सध्या चर्चेत असलेल्या कोट्यवधींच्या घोटाळाप्रकरणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी तातडीने नेवारे नामक महिलेला निलंबित केले आहे. या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती देखील स्थापन करण्यात आली आहे.

नागपूर जिल्हा परिषदेच्या इतिहासामधील आतापर्यंतचा हा सर्वात मोठा घोटाळा असल्याचे बोलले जाते. विशेष म्हणजे ही महिला रजेवर असताना तो उघडकीस आला आहे. अनेक वर्षांपासून हा प्रकार सुरु असल्याची माहिती आहे. या महिलेकडे शिक्षण विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पेन्शनची प्रकरणे होती. सेवानिवृत्तीनंतर मृत कर्मचारी जिवंत असल्याचे दाखवत, त्यांची पेन्शन आपल्या जवळील व्यक्ती, मित्र, नातेवाईक यांच्या खात्यात ही महिला बेकायदेशीररित्या मृत व्यक्तींची पेन्शन रक्कम वळत होती. चौकशी समितीचा अहवाल आल्यावर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे सीईओ योगेश कुंभेजकर यांनी सांगितले आहे.

सदर महिला अनेक वर्षांपासून नियमबाह्यपणे पंचायत समितीमध्ये एकाच ठिकाणी कार्यरत आहे. नियमानुसार एका कर्मचाऱ्याकडे तीन ते पाच वर्षापेक्षा जास्त काळ एक काम ठेवता येत नसताना, या महिला कर्मचाऱ्यावर बीडीओकडूनही कारवाई करण्यात आली नाही. या संदर्भात त्यांनी माध्यमांशी बोलणे टाळले.

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार पंचायत समिती अंतर्गत शिक्षण विभागातील सुमारे २०० अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनाशी संबंधित काम या महिलेकडे होते. यातील किमान ३० जणांचा मृत्यू झाला. १८ ते २० मृत कर्मचाऱ्यांची निवृत्ती रक्कम दरमहा ही महिला तिच्या परिचयातील व्यक्तींच्या खात्यात वळती करीत होती. यातून दरमहा साधारण ५ लाख रुपयांचा अपहार ही महिला करीत असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. परंतु फसवणुकीचा हे आकडा आणखी मोठा असू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Back to top button