इतिहासाचे विकृतीकरण थांबवा : संभाजीराजे | पुढारी

इतिहासाचे विकृतीकरण थांबवा : संभाजीराजे

हिंजवडी : पुढारी वृत्तसेवा :  चित्रपट सृष्टीतील निर्माते निर्देशक यांनी चित्रपटाच्या माध्यमातून होणारे इतिहासाचे विकृतीकरण थांबवावे, असे मत माजी खासदार संभाजी राजे भोसले यांनी हिंजवडी येथे व्यक्त केले. येथील छत्रपती शिवाजी राजे यांच्या प्रतिमेचे अनावरण भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. आकर्षक विद्युत रोषणाई, भव्य मिरवणूक, ढोल ताश्यांचा आवाज आणि जय भवानी.. जय शिवाजी या घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता.

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज मूर्ती परिसर सुशोभिकरणाचा अनावरण सोहळा रविवारी मोठ्या थाटामाटात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. या वेळी राज्यसभेचे माजी खासदार श्रीमंत छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत संपूर्ण आयटीनगरी शिवमय झाली होती. या सोहळ्यासाठी खासदार श्रीरंग आप्पा बारणे, माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांच्यासह शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हिंजवडी येथील मुख्य चौकात असलेल्या अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्ती परिसराचे नुकतेच सुशोभिकरण करण्यात आले असून याच्या अनावरण सोहळ्यासाठी छत्रपती संभाजीराजे आवर्जून उपस्थित होते. उद्घाटनप्रसंगी बोलत असतांना छत्रपती संभाजी राजेंनी हिंजवडी ग्रामपंचायतीच्या एकीचे व कार्यपद्धतीचे कौतुक केले. तसेच इतिहास जोपासण्याची जबाबदारी आपली असून सर्वांनी इतिहास वाचला पाहिजे. इतिहासाची मोडतोड करून चित्रपट काढले तर हे मी कदापि सहन करणार नसल्याचे सांगत त्यांनी निर्माते व दिग्दर्शकांना सुनावले.

Back to top button