कोल्हापूर : मराठी भाषा आई, तर कन्नड मावशी; कुरुंदवाडमधील जुन्या आठवणींनी डॉ. सुधा मूर्ती भारावल्या | पुढारी

कोल्हापूर : मराठी भाषा आई, तर कन्नड मावशी; कुरुंदवाडमधील जुन्या आठवणींनी डॉ. सुधा मूर्ती भारावल्या

कुरुंदवाड : पुढारी वृत्तसेवा : मराठी भाषा ही आई आहे. तर कन्नड भाषा ही मावशी आहे. मी जगभर फिरले असले तरी कुरुंदवाड ही माझी मातृभूमी आहे. हे कदापि विसरणार नाही, माझ्या परिवाराचे नातेसंबंध अतूट आहे, अशा शब्दांत इन्फोसेसच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी, लेखिका डॉ. सुधा मूर्ती यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.

कुरुंदवाड येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांचा व कुटुंबीयांचा रहिवास होता. त्यांचे पाचवी पर्यंतचे शिक्षण कुरुंदवाड येथे झाले आहे. सोमवारी (दि. ७) डॉ. मूर्ती सांगली येथील एका कार्यक्रमासाठी आल्या असता त्यांनी कुरुंदवाडला धावती भेट दिली. यावेळी त्यांनी जिल्हा परिषदेचा दवाखाना, कुमार विद्या मंदिर क्र. 3 ला भेट देऊन जुन्या आठवणींना उजाळा दिला. तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे-धुमाळ, सपोनि बालाजी भांगे उपस्थित होते.

डॉ. मूर्ती म्हणाल्या की, आमचे वडील डॉ. रामचंद्र कुलकर्णी हे 1955 साली येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते. खगोल शास्त्रज्ञ डॉ. श्रीनिवास कुलकर्णी यांचा जन्म याच ठिकाणी झाल्याची आठवण त्यांनी सांगितली. त्यांची मोठी बहीण स्त्रीरोग तज्ञ डॉ. सुनंदा कुलकर्णी यांचे येथील कन्या विद्या मंदिर क्र.3 मध्ये चौथी पर्यंतचे शिक्षण झाल्याचे त्यांनी सांगितले. कै. शंकरराव शिंदे, सुशिला शहा यांची आठवण काढून त्यांच्या घराला भेटी दिल्या.

त्याकाळी डॉ. रामचंद्र कुलकर्णी यांच्याशी पोस्टाद्वारे झालेल्या पत्र व्यवहाराची पत्रे, काही आठवणीचे फोटो, त्यांच्या बंधूंचा जन्म, अशा आठवणींच्या फोटोंचा अल्बम त्यांना भेट म्हणून प्रा. शरदचंद्र पराडकर यांनी दिला. डॉ. मूर्ती यांनी अल्बम बघितल्यानंतर त्यांचा जुन्या आठवणींनी कंठ दाठून आला.

डॉ. मूर्ती यांनी शिक्षण घेतलेल्या कन्या विद्या मंदिर शाळेलाही त्यांनी भेट दिली. यावेळी डॉ. मूर्ती म्हणाल्या की, सध्या डिजिटल प्रणालीद्वारे शिक्षण पद्धती विकसित झाली आहे. त्याचा जास्तीत जास्त उपयोग विद्यार्थ्यांना करून दिला पाहिजे. विद्यार्थी हे संशोधक रूपाने घडले पाहिजेत. याकडे शिक्षकांनी लक्ष दिले पाहिजे. या शाळेच्या दुरुस्तीसाठी मी पैसे देईन, प्रस्ताव पाठवा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी कुरुंदवाड अर्बन बँकेचे चेअरमन अरुण आलासे, रवी किरण गायकवाड, अजित देसाई, जे. जे. कुलकर्णी, गिरीश हुद्दार, रविकुमार पाटील आदी उपस्थित होते.

हेही वाचलंत का ? 

Back to top button