पुणे : शिष्यवृत्ती विचारात घेऊनच शुल्क घ्या; तंत्रशिक्षण संचालनालयाचा महाविद्यालयांना इशारा | पुढारी

पुणे : शिष्यवृत्ती विचारात घेऊनच शुल्क घ्या; तंत्रशिक्षण संचालनालयाचा महाविद्यालयांना इशारा

पुणे; पुढारी वृत्तसेवा: तंत्रशिक्षणच्या विद्यार्थ्यांना प्रवेशावेळी महाविद्यालयांकडून पूर्ण शुल्काची मागणी करण्यात येते, परंतु महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना देण्यात येत असलेली शिष्यवृत्तीची रक्कम विचारात घेऊनच शुल्काची मागणी करावी. महाविद्यालये पूर्ण शुल्क मागतात अशी तक्रार विद्यार्थ्यांनी केल्यास संबंधित महाविद्यालयांवर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. अभय वाघ यांनी दिला आहे.

शैक्षणिक वर्ष 2022-23 मधील संचालनालयांतर्गत असलेल्या व्यावसायिक पदवी-पदव्यूत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या केंद्रिभूत प्रवेश प्रक्रिया सुरू झालेल्या आहेत. या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग, विशेष मागास प्रवर्ग या उमेदवारांना संबंधित विभागांमार्फत वेळोवेळी शिष्यवृत्तीसंदर्भात शासन निर्णय जाहीर करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना व डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता विस्तारित योजना लागू करण्यात आली आहे.

त्यानुसार सर्व पदविका संस्थांमध्ये तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत आणि तांत्रिक व्यावसायिक पदवी, पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या संस्थांमध्ये राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत करण्यात येणार्‍या केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेच्या माध्यमातून प्रवेश प्राप्त होणार्‍या उमेदवारांना त्यांच्या संवर्गाप्रमाणे शासनामार्फत शैक्षणिक शुल्क रक्कम शिष्यवृत्ती स्वरूपात देण्यात येते. केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेमार्फत प्रवेश घेणार्‍या उमेदवारांकडून प्रवेशाच्या वेळी संबंधित शासन निर्णयानुसार देय शुल्क घ्यावे.

याची माहिती सर्व पदविका, व्यावसायिक पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या संस्थांना कळविण्यात यावी. संबंधित संस्थाकडून विद्यार्थ्यांची प्रवर्गनिहाय मिळणारी शिष्यवृत्ती विचारात न घेता शुल्क घेत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधित संस्थेविरुद्ध कारवाई प्रस्तावित करण्यात यावी आणि केलेल्या कार्यवाहीचा अहवाल संचालनालयास सादर करण्यात यावा, असे स्पष्ट आदेश डॉ. वाघ यांनी विभागीय सहसंचालकांना दिले आहेत.

Back to top button