तुळशी विवाहानंतर वाजणार सनई, चौघड्याचे सूर; जूनपर्यंत विवाहाचे ५८ मुहूर्त | पुढारी

तुळशी विवाहानंतर वाजणार सनई, चौघड्याचे सूर; जूनपर्यंत विवाहाचे ५८ मुहूर्त

गेवराई : गजानन चौकटे : कार्तिक एकादशीला दीपावली उत्सवाची सांगता होते. ५ नोव्हेंबरला कार्तिक शुक्ल द्वादशी असून या दिवसापासून ते कार्तिक शुक्ल पौर्णिमा (८ नोव्हेंबर) पर्यंत तुळशी विवाह साजरा करण्याची रुढ परंपरा आहे. ५ नोव्हेंबरला चातुर्मास समाप्ती आणि शनी प्रदोष व शाकव्रत समाप्ती असल्याने या दिवसापासून विवाह सोहळे सुरू होणार आहेत. यावर्षी जवळपास ५८ विवाह मुहूर्त असल्याची माहिती वेधशास्त्र तज्ज्ञ नागेश शास्त्री चौथाईकर यांनी दिली.

भारतीय पंचांगानुसार तत्कालीन पर्यावरणीय वर्तमाननुसार पावसाळा आटोपल्यानंतर सोयीनुसार म्हणून वैवाहिक सोहळे केले जातात. त्यानुसार वैदिक परंपरेनुसार आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीपासून देव शनी ते कार्तिक शुक्ल एकादशीपर्यंत देव उठणे, चातुर्मास पाळला जातो. या काळात भगवान विष्णू निद्राधीन असतात, असा समज आहे. विष्णू आणि लक्ष्मी या विवाहाच्या देवता असल्याने या काळात वैवाहिक सोहळे मौंजीबंधन साजरे करू नये, अशी भावना प्राचीन परंपरेनुसार भारतात आहे. आज ही प्रथा पाळली जाते. यंदा देव उठणे, एकादशी ४ नोव्हेंबरला येत असून द्वादशीला भगवान विष्णूचा अवतार श्रीकृष्ण यांच्याशी तुळशीचा विवाह लावण्यात येतो. आणि तेव्हापासून विवाह मुहूर्त काढण्याची परंपरा अखंडपणे चालत आलेली आहे.

विवाह मुहूर्ताच्या तारखा

नोव्हेंबर २५, २६, २८, २९
डिसेंबर ‌२, ४, ८, ९, १४, १६, १७, १८, १९
जानेवारी १८, २६, २७, ३१,
फेब्रुवारी ६, ७, १०, ११, १४, १६, २३, २४, २७, २८
मार्च ९, १३, १७, १८
एप्रिल ३०
मे २, ३, ४, ७, ९, १०, ११, १२, १५, १६, २१, २२, २९, ३०
जून १, ४, ७, ८, ११, १२, १३, १४, २३, २६, २७, २८

यंदा २५ नोव्हेंबर २०२२ ते २८ जून २०२३ या काळात शास्त्रानुसार एकूण ५८ विवाह मुहूर्त येत आहेत. २०२३ मध्ये गुरुचा अस्त असल्यामुळे फक्त रविवारी दि. ३० एप्रिलरोजी विवाह मुहूर्त आहे. २९ जूनपासून चातुर्मास सुरू होत आहे.
– सुर्यकांत मुळे गुरूजी, ज्योतिष अभ्यासक, बीड

 

यंदा लग्नाचे भरपूर मुहूर्त असून तुळशी विवाहानंतर लगेच विवाह मुहूर्तांना सुरुवात होत आहे. २५ नोव्हेंबरपासून लग्न सोहळ्याला सुरुवात होत आहे. त्यानिमित्त वधू -वर आतापासून दागिने खरेदी करू लागले आहेत.

-बाळू बेदरे, सुवर्णकार, बेदरे ज्वेलर्स, गेवराई

हेही वाचलंत का ? 

Back to top button