चंद्रपूर: 'पीडब्ल्यूडी'चा कनिष्ठ अभियंता २ लाखांची लाच घेताना 'लाचलुचपत'च्या जाळ्यात | पुढारी

चंद्रपूर: 'पीडब्ल्यूडी'चा कनिष्ठ अभियंता २ लाखांची लाच घेताना 'लाचलुचपत'च्या जाळ्यात

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा: केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत बांधकाम करण्यात आलेल्या पुलाच्या बांधकामाचे देयके अदा करण्याकरीता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (वर्ग 2)  कनिष्ठ अभियंता २ लाखांची लाच घेताना रंगेहाथ जाळ्यात सापडला. ही कारवाई मंगळवारी चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती येथे लाचलुचपत पथकाने केली. अनिल जगन्नाथ शिंदे असे लाचखोर अभियंत्याचे नाव आहे. या घटनेने सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये खळबळ माजली आहे.

लाचलुचपत विभागाने दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारच्या आर. कसी. एल. डब्लू. सी. योजनेतंर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यात १ कोटी रुपयाच्या किंमतीचे काम मंजूर करण्यात आले. पुलाच्या कामाचे कंत्राट वरूर रोड येथील एका कंत्राटदाराला मिळाले होते. सदर कंत्राटदार यांनी मुंगसाजी कन्स्ट्रक्शन कंपनी यवतमाळ यांच्या वतीने पुलाचे बांधकाम सुरू करून पूर्ण केले होते. पूर्ण झालेल्या पुलाचे बांधकामाचे निरीक्षण जिवती सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे कनिष्ठ अभियंता अनिल शिंदे यांनी केले होते. तक्रारदाराचे 1 कोटीचे एकूण चार बिले होते. त्यापैकी 2 बिले तयार करून सार्वजनिक बांधकाम विभाग चंद्रपूर येथे पाठविणे व बिले मंजूर करणे तसेच उर्वरीत दोन बिल तयार करून मंजुरीकरीता पाठविण्याकरीता कनिष्ठ अभियंता अनिल शिंदे यांनी दोन लाखांची लाचेची मागणी केली होती.

परंतु तक्रारदार यांची लाच देण्याची इच्छा नव्हती. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला 7 जून 2022 ला तक्रार करण्यात आली होती. तक्रार प्राप्त होताच लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सदर तक्रारीची पडताळणी केली असता, गैर अर्जदाराने तक्रारदाराकडून बिल मंजूर करण्याकरीता दोन लाखांची मागणी केल्याचे स्पष्ट झाल्याने दोन लाख रूपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, अप्पर पोलीस अधीक्षक मधुकर गिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक अविनाश भामरे यांनी पोलीस निरीक्षक शिल्पा भरडे, रोशन चांदेकर, नरेशकुमार नन्नावरे, रविकुमार ढेंगळे, वैभव गाडगे, अमोल सिडाम, राकेश जांभूळकर, मेघा मोहुर्ले, पुष्पा काचोळे, हाके यांनी केली.

हेही वाचा :  

Back to top button