पलुस येथील रखडलेल्या गटारीवर सर्वपक्षीय नारळफोडो आंदोलन | पुढारी

पलुस येथील रखडलेल्या गटारीवर सर्वपक्षीय नारळफोडो आंदोलन

पलूस : पुढारी वृत्तसेवा

पलुस येथे मुख्य बाजारपेठत, बँक ऑफ इंडिया समोरील गटारीचे काम गेल्या सहा महिन्यांपासून रखडले आहे. या गटाराच्या कामाचा निषेध म्हणून स्वाभिमानी विकास आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसेना व मनसे या पक्षाच्या वतीने निकृष्ट गटारीच्या कामाचे नारळफोडो आंदोलन करण्यात आले. यावेळी रखडलेल्या गटारीवर नारळ फोडून सत्ताधार्यांचा निषेध नोंदवला.

यावेळी राष्ट्रवादीचे नेते मारुती चव्हाण म्हणाले की नगरपरिषदच्या इतिहासात नोंद घेण्यासारखे काम या सत्ताधारी काँग्रेस पक्षाने केले आहे. या गटारीचे काम सात महिने झाले पूर्ण करता आले नाही. या रस्त्याच्या अडचणीमुळे इथला व्यापार कुंडल ताकारीकडे गेला. या बाजारपेठेतील व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. सत्ताधारी निवडणुकीच्या तोंडावर ती सगळीकडे नारळ फोडत सुटली आहे. येणाऱ्या निवडणुकीत जनता त्यांना त्यांची जागा नक्की दाखवेल.

स्वाभिमानी विकास आघाडीचे प्रमुख निलेश येसूगडे म्हणाले सात महिन्याच्या कालावधीत पलूस मध्ये उड्डाण पूल बांधून झाला असता. परंतु या सत्ताधारी यांना ५० फुटाचे गटार पूर्ण करता आले नाही. या ठिकाणचे गटारीचे काम १५ दिवसात पूर्ण केले नाही तर पलूस मधील सामान्य जनतेसह सर्वपक्षीय उपोषणाला बसणार आहे.

मनसे तालुकाध्यक्ष सागर सुतार म्हणाले  की भुयारी गटारिला खड्डा ओव्हरलोड वाहतुकीमुळे पडलेला आहे. मुख्याधिकारी यांच्याकडे  पाठपुरावा करून सुद्धा दुर्लक्ष केले. सार्वजनिक बांधकाम विभाग पलूस यांनी मुख्याधिकारी सुमित जाधव यांनी २ सिमेंट पाईप टाकायचा सल्ला दिलेला असतानासुद्धा ठेकेदाराच्या आर्थिक हितासाठी या  गटारीचे बांधीव काम करण्याचा घाट मुख्याधिकारी यांनी घातला आहे. ज्या कामास ८ दिवस लागणारं होते त्या कामास सहा महीने वेळ लागला. रखडलेल्या कामास  मुख्याधिकारी जबाबदार असून त्यांच्यावर कारवाही व्हावी.

आमची लढाई कोणत्या पक्षाविरोधात नाही : शिवसेना

शिवसेना तालुकाध्यक्ष प्रशांत लेंगरे म्हणाले की आमची लढाई ही कोणत्या एका पक्षाच्या, नेत्याच्या  विरोधात नसून ती फक्त पलूसच्या जनतेसाठी आहे.येणाऱ्या काळात जनतेसाठी भांडू, आंदोलन करू. गेल्या सहा महिन्यापासून गटारीचे रखडलेले काम दुर्दैवी आहे.

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पोपटराव मोरे, नगरसेवक दिलीप जाधव,नगरसेवक कपिल गायकवाड, मारुती चव्हाण, पी एस माळी,किशोर माळी ,आनंदराव निकम,जे पी पाटील,नंदकुमार पाटील,सुनील घोरपडे,अभय पाटील,ऋषिकेश पाटील,वासुदेव देशमुख,बंडोपंत निकम,रावसाहेब गोंदिल, सुधीर लाड,निवृत्ती माळी, नागेश येसूगडे,संतोष येसूगडे,अशोक चव्हाण, शंकर ढेरे,अशोक पवार,अशोक खामकर,सर्जेराव पाटील,मधुकर पवार,मधुकर पुदाले व कार्यकर्ते उपस्थित होते.

Back to top button