आमदार सुमन पाटील अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी आल्या धावून | पुढारी

आमदार सुमन पाटील अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी आल्या धावून

तासगाव : पुढारी वृत्तसेवा

तासगाव – मणेराजुरी रस्त्यावरील ग्रामीण रुग्णालयापासून जवळच शनिवारी ( दि. ११ ) एका आयशर ट्रकने दुचाकीला ठोकरले. यावेळी तासगावहून अंजनीकडे निघालेल्या आमदार सुमन पाटील अपघात ग्रस्तांच्या मदतीला धावून आल्या.

आमदार सुमन पाटील यांनी अपघातातील दोन जखमी व्यक्तींना ग्रामीण रुग्णालयात नेऊन तातडीने उपचार करण्याची व्यवस्था केली. याचबरोबर गंभीर जखमीस पुढील उपचारासाठी मिरजकडे घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिकेचीही सोय उपलब्ध करुन दिली.

तासगाव येथील गणपतीच्या ऐतिहासिक रथोत्सवानिमित्त दर्शन घेऊन अंजनीकडे परत जात असताना त्यांच्या गाडीसमोर एका आयशर ट्रकने मोटरसायकलला ठोकरले. या अपघातात मोटरसायकल वरील दोघे जखमी झाले. जखमी अवस्थेत रस्त्यावर पडलेल्या दोघांना पाहून गाडी थांबवून त्या गाडीतून उतरल्या.

जवळच ग्रामीण रुग्णालय असल्याने त्यांनी वैद्यकीय अधिका-यांना अपघातस्थळी बोलावून घेतले. कर्मचा-यांच्या मदतीने जखमींना ग्रामीण रुग्णालयात घेऊन गेल्या. तातडीने उपचार सुरु करण्याची व्यवस्था केली.

यापैकी एकाची तब्येत नाजूक असल्याचे डॉक्टरांनी सांगताच त्याला पुढील उपचारासाठी मिरजकडे नेण्यासाठी रुग्णवाहिकेची व्यवस्था करुनच त्या अंजनीकडे मार्गस्थ झाल्या.

हेही वाचले का?

Back to top button