पिंपरी : चॅटबॅट प्रणालीद्वारे पाण्याच्या तक्रारी सोडविण्यासाठी सहा कर्मचारी | पुढारी

पिंपरी : चॅटबॅट प्रणालीद्वारे पाण्याच्या तक्रारी सोडविण्यासाठी सहा कर्मचारी

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विभागांकडून पुरविल्या जाणार्‍या सेवासंदर्भात असलेल्या तक्रारी सोडविण्यासाठी पालिकेने चॅटबॅट ही व्हॅट्सअ‍ॅप प्रणाली तसेच, पाणीपुरवठ्यासाठी हेल्पलाइन सुविधा सुरू केली आहे. त्या कामासाठी एकूण 6 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.

ऐन दिवाळीत अपुरा पाणीपुरवठा
संबंधित कर्मचार्‍यांचा दरमहा खर्च 1 लाख 48 हजार 170 इतका आहे. तर, उन्हाळ्यात शहरात अपुर्‍या व कमी प्रमाणात पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्याची दखल घेऊन तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांनी पाणीपुरवठा विभागासाठी 7722060999 या क्रमांकावर स्वतंत्र हेल्पलाइन सुरू केली होती. त्या क्रमांकावर पाण्यासंदर्भात असंख्य तक्रारी प्राप्त होत आहेत. ऐन दिवाळीत पाणी न आल्याने या क्रमांकावर शेकडो तक्रारी करण्यात आल्या. या हेल्पलाइनसाठी दोन कर्मचारी नेमले आहेत.

एका कर्मचार्‍याला 24 हजार 695 रुपये मानधन
एका कर्मचार्‍याला महापालिका 24 हजार 695 रूपये दरमहा मानधन देते. त्यानुसार 13 एप्रिल ते 12 जुलै 2022 या तीन महिन्यांसाठी एकूण 4 लाख 44 हजार 510 रूपये खर्च झाला आहे. अधिकार्‍यांच्या सोईसाठी आणि नागरिकांच्या मागणीवरून ही चॅटबॅट प्रणाली व हेल्पलाइन सुविधा कायम ठेवण्यात येणार आहे.

व्हॅट्सअ‍ॅपवर करता येते तक्रार
आरोग्य व इतर विभागांच्या सेवासंदर्भात नागरिकांच्या तक्रारी आहेत. त्या तातडीने सोडविण्यासाठी पालिकेने 8888006666 या क्रमाकांवर चॅटबॅट ही व्हॅट्सअ‍ॅप प्रणाली पुन्हा नव्याने सुरू केली आहे. या माध्यमातून नागरिक थेट व्हॅट्सअ‍ॅपवर छायाचित्रासह तक्रार करत आहेत. या माध्यमातून आलेली तक्रार संबंधित विभागप्रमुखांकडे पाठविली जाते.

विभागप्रमुख ती तक्रार थेट संबंधित अधिकारी व कर्मचार्‍यांकडे पाठवितात. तक्रारींचे निरसन झाल्यानंतर चॅटबॅटवर कार्यवाही केल्यानंतरचे छायाचित्र पोस्ट केले जाते. प्राप्त तक्रारींचे तत्काळ निरसन करण्यात येत असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. चॅटबॅट प्रणालीसाठी पालिकेने चार कर्मचारी नेमले आहेत.

Back to top button