माळेगाव : आ. रोहित पवार यांनी साधला दिलखुलास संवाद | पुढारी

माळेगाव : आ. रोहित पवार यांनी साधला दिलखुलास संवाद

माळेगाव; पुढारी वृत्तसेवा: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार व विधानसभेतील विरोधी पक्षनेतेे अजित पवार यांची मी कॉपी करत नाही. माझी काम करण्याची वेगळी शैली असल्याचे सांगत आमदार रोहित पवार यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना दिलखुलास उत्तरे देत माळेगावकरांची मने जिंकली. माळेगाव नगरपंचायतीच्या भव्य पटांगणावर दिवाळी सणानिमित्त माळेगावातील पत्रकारांच्या वतीने प्रथमच दीपावली सण साजरा करून पत्रकारांच्या कट्ट्यावर हा एक आगळा-वेगळा उपक्रम राबविण्यात आला.

या पार्श्वभूमीवर कर्जत -जामखेडचे आमदार रोहित पवार व भाजपनेत्या संगीताराजे निंबाळकर यांची प्रकट मुलाखत विविध दैनिकाच्या पत्रकारांनी घेतली. या वेळी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, महिला, युवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने
उपस्थित होते. या वेळी आमदार रोहित पवार यांनी बालपणीची दिवाळी, उद्योजक ते आमदार, चालू राजकीय घडामोडी, कर्जमाफी, अस्तरीकरण, नोकरी यांबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली.

तर, संगीताराजे निंबाळकर यांनी आजच्या राजकारणावर स्पष्ट भाष्य करून सर्व पक्ष एकच असतात, यामुळे कार्यकर्त्यांनी राजकारण करताना स्वतः व कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन केले. उपस्थितांना पत्रकार संघाच्या वतीने दिवाळी फराळ वाटप करण्यात आले. या वेळी प्रा. अनिल धुमाळ, सतीश गावडे, विजय भोसले, योगेश भोसले, प्रणव तावरे, भारत तुपे, संदीप आढाव, आसिफ शेख, प्रदीप जगदाळे आदी उपस्थित होते. कल्याण पांचागणे यांनी सूत्रसंचालन केले. योगेश भोसले यांनी आभार मानले.

Back to top button