लोणी पंचक्रोशीत तीन बिबट्यांचा वावर; पाळीव प्राण्यांवर हल्ला, नागरिक भयभीत | पुढारी

लोणी पंचक्रोशीत तीन बिबट्यांचा वावर; पाळीव प्राण्यांवर हल्ला, नागरिक भयभीत

लोणी-धामणी; पुढारी वृत्तसेवा: वाळुंजनगर-लोणी (ता. आंबेगाव) पंचक्रोशीत गेल्या तीन-चार वर्षांपासून तीन बिबट्यांचा वावर आहे. अनेक शेतकर्‍यांना बिबटे सातत्याने दिसत आहेत. वन खात्याच्या अधिकार्‍यांंना याबाबत तोंडी व लेखी माहिती दिली असता सदर अधिकार्‍यांनी पिंजरा लावण्यास असमर्थता व्यक्त केली. सदर बिबट्यांनी वाळुंजनगर परिसरातील अनेक पाळीव कुत्री व शेळ्या, मेंढ्या, लहान वासरे यांचा फडशा पाडला आहे.

तसेच, वन विभागातील वन अधिकारी साईमाला गिते, वनसेवक बाळासाहेब आदक, बाळासाहेब लंके यांनी पंचनामे करून काही शेतकर्‍यांना भरपाई मिळवून दिली. परंतु, आता बिबट्याच्या सततच्या वावराने व जनावरांवरील व पाळीव कुर्त्यांवरील हल्ल्याने वाळुंजनगर-लोणी पंचक्रोशीतील नागरिक भयभीत झाले आहेत. बाहेर फिरण्यासही नागरिकांना भीती वाटत आहे.

वन विभागाच्या अधिकारीवर्गाने ही बाब गांभीर्याने घेत सदर बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना करावी. जांबुतसारखी दुर्दैवी घटना घडण्यापूर्वीच बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी सरपंच विजय सिनलकर, माजी सरपंच महेंद्र वाळुंज, सोसायटीचे अध्यक्ष शरद वाळुंज यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.

Back to top button