बिबट्याचा महिलेवर हल्ला चांडोली खुर्द येथील घटना | पुढारी

बिबट्याचा महिलेवर हल्ला चांडोली खुर्द येथील घटना

मंचर; पुढारी वृत्तसेवा: चांडोली खुर्द (ता. आंबेगाव) गावच्या हद्दीत दुचाकीवरून घरी जाणार्‍या महिलेवर बिबट्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना गुरुवारी (दि.27) रात्री 9 च्या सुमारास घडली. या हल्ल्यात स्नेहा नवनाथ थोरात (वय 27, रा. चांडोली बुद्रुक, ता. आंबेगाव) यांच्या पायाला बिबट्याने पंजा मारल्याने त्या जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर मंचर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

स्नेहा थोरात यांचे मंचर येथे पार्लरचे दुकान आहे. दि. 27 रोजी स्नेहा थोरात या पतीबरोबर मैत्रीणीच्या डोहाळ जेवण कार्यक्रमाला चाळीस बंगला मंचर येथे गेल्या होत्या. कार्यक्रम संपल्यानंतर ते जुन्या चांडोली रस्त्याने दुचाकीवरून घरी जात असताना ऊसात लपलेल्या बिबट्याने दुचाकीवर मागे बसलेल्या स्नेहा थोरात यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात बिबट्याने त्यांच्या पायाला पंजा मारल्याने त्या जखमी झाल्या.

अचानकपणे बिबट्याने केलेल्या हल्ल्याने नवनाथ थोरात यांचे गाडीवरचे नियंत्रण सुटले, मात्र त्यांनी पायाने गाडीचा तोल सावरत गाडी जोरात पळवून जीव वाचवला. घरी आल्यानंतर त्यांनी पत्नीला चारचाकी वाहनातून मंचर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. घटनेची माहिती कळताच वन अधिकारी एस. एल. गायकवाड यांनी थोरात यांची रुग्णालयात भेट घेऊन विचारपूस करत घटनेची माहिती घेतली. या परिसरात असलेल्या बिबट्याला लवकरात लवकर जेरबंद करावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

 

Back to top button