अतिवृष्टी नुकसानीचा प्रश्न केंद्र, राज्य शासनाकडे मांडणार; शरद पवार यांचे प्रतिपादन | पुढारी

अतिवृष्टी नुकसानीचा प्रश्न केंद्र, राज्य शासनाकडे मांडणार; शरद पवार यांचे प्रतिपादन

परिंचे, पुढारी वृत्तसेवा: महाराष्ट्रातील शेतकरी संकटात सापडला असून, शेतकर्‍यांच्या पाठीशी उभे राहून अतिवृष्टीचा प्रश्न केंद्र व राज्य शासनाकडे मांडणार असल्याचे माजी केंद्रीय कृषिमंत्री, खासदार शरद पवार यांनी परिंचे (ता. पुरंदर) येथे शेतकरी संवाद कार्यक्रमात सांगितले. शेतकर्‍यांना आधार देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. या वेळी खा. सुप्रिया सुळे, आमदार संजय जगताप उपस्थित होते. कार्यक्रमात महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट कर्जमाफी करण्याची मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.

शेतकरी संवाद कार्यक्रमात शेतकर्‍यांनी शेतीमालाला हमी भाव, पिलानवाडी पाणी योजना, पुरंदर विमानतळ, जेजुरी येथील रेल्वेचा प्रश्न, तरुणांना रोजगार आदी विषयांवर प्रश्न विचारले, त्या प्रश्नांना उत्तर देताना शरद पवार म्हणाले की, केंद्रीय कृषिमंत्री असताना राबवलेल्या फळबाग योजनेमुळे कोकणातील तरुणांचे मुंबईला नोकरीसाठी स्थलांतरित होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. कांदा निर्यातीच्या प्रश्नावर बोलताना पवार म्हणाले की, देशाचे कृषीमाल निर्यात धोरण वारंवार बदलत असल्याने इतर देशांना मागणीनुसार शेतीमाल पोहचवणे शक्य होत नाही.

शिंदे सरकारची भूविकास बँकेची कर्जमाफीची घोषणा फसवी असून गेल्या दहा वर्षांत एकाही शेतकर्‍याला या बँकेकडून कर्जपुरवठा झाला नाही. गुंजवणीच्या पाण्यावर राजकारण न करता एक विचाराने योजना राबविल्यास तालुक्यातील शेतकर्‍यांना या योजनेचा फायदा होणार असल्याचे सांगितले. पुरंदरमधून गेल्या वर्षी पाच लाख टन ऊस सोमेश्वर कारखान्यात गाळपासाठी गेला आहे. कारखान्याने शिक्षण करापोटी पुरंदरमधील शेतकर्‍यांकडून जमा केलेल्या रकमेतून पुरंदर तालुक्यातील मुलींच्या शिक्षणासाठी सुविधा पुरवल्या पाहिजेत, असेही पवार यांनी सांगितले.

कार्यक्रमात आमदार संजय जगताप, जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले, या वेळी माणिकराव झेंडे, सुदाम इंगळे, विजय कोलते, पुरुषोत्तम जगताप आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत पुष्कराज जाधव, प्रस्तावित हेमंतकुमार माहूरकर यांनी केले व आभार माणिकराव झेंडे यांनी मानले.

पुरंदर विमानतळ देशाची गरज

पुरंदरमध्ये होणारे विमानतळ ही महाराष्ट्राची गरज नसून देशाची गरज आहे, कमीत कमी शेतकर्‍यांचे नुकसान होईल, याचा विचार करून विमानतळ केला जाणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

मी काय म्हातारा झालोय का?

याच कार्यक्रमात एका शेतकर्‍याने पवार यांना ‘साहेब आपण गेल्या दहा वर्षांत दोनदा माझ्या स्वप्नात आला होता असे सांगितले, त्यावेळी पवार यांनी हे स्वप्न पहाटे पडले की रात्री असे विचारताच एकच हशा पिकला, दुसर्‍या एका वयोवृद्ध कार्यकत्याने ‘साहेब आता या वयात आपण कोठे बाहेर फार फिरू नये, एका जागेवर बसून रिमोट कंट्रोल चालवावा, असे पवार यांच्या काळजीपोटी सुचविले. त्यावर पवार यांनी, मी काय म्हातारा झालोय का, असे मिश्किलपणे या कार्यकर्त्याला विचारले. सरकारच्या भूविकास बँकेच्या कर्जमाफीविषयी बोलतानाही पवार यांनी असाच मिश्किल चिमटा काढताना ‘लबाडा घरचे आवतण जेवल्याशिवाय खरे नाही, असे म्हणताच हशा पिकला.

Back to top button