पिंपरी : अर्धे वर्ष संपल्यानंतर विद्यार्थ्यांना गणवेश वाटप, ‘पुढारी’च्या वृत्तानंतर प्रशासनाने तातडीने उचलली पावले | पुढारी

पिंपरी : अर्धे वर्ष संपल्यानंतर विद्यार्थ्यांना गणवेश वाटप, ‘पुढारी’च्या वृत्तानंतर प्रशासनाने तातडीने उचलली पावले

पिंपरी : महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या कारभारामुळे विद्यार्थी गणवेशापासून वंचित होते. अखेर अर्धे शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर शालेय गणवेश, पी. टी. गणवेश व स्वेटर वाटपास सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे उशिरा का होईना; गणवेश वाटप होत असल्याने विद्यार्थ्यांसह पालक समाधान व्यक्त करीत आहेत.

‘पालिका शाळेच्या विद्यार्थ्यांच्या गणेवश वाटपाचा नवा मुहूर्त; प्रशासकीय राजवटीत शिक्षण विभागाच्या संथगती कारभारावर सर्वसामान्य पालकांचा रोष’ या शीर्षकाखाली ‘पुढारी’ने 22 सप्टेंबरला वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर शिक्षण विभागासह प्रशासनाने तातडीने पावले उचलत गणेवश वाटपास गती दिली. अखेर गणवेश वाटपास सुरुवात केली.

अर्धे शैक्षणिक वर्षे संपत आले तरी, विद्यार्थ्यांना गणवेश व शालेय साहित्य मिळाले नसल्याने विद्यार्थ्यांसह पालक व माजी नगरसेवक संताप व्यक्त करीत होते. त्यासंदर्भात आंदोलनही झाली होती. अखेर शिक्षण विभागाने या महिन्यापासून गणेवश वाटपास सुरुवात केली. पालिकेचे बालवाडी ते दहावी इयत्तेचे तब्बल 51 हजार विद्यार्थी आहेत. एकूण 105 शाळांपैकी आतापर्यंत 67 शाळांमध्ये गणवेश वाटप पूर्ण झाले आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांना दोन गणवेश, दोन पीटी गणवेश व एक स्वेटर मोफत देण्यात आले आहेत.

खाते उघडण्यासाठी शिबिर घेणार

सद्यस्थितील 23 हजार 530 विद्यार्थ्यांच्या पालकांचे बँक खाते आहेत. उर्वरित विद्यार्थी व पालकांचे बँक खाती उडण्यासाठी विशेष शिबिर मुख्याध्यापक घेणार आहेत. अधिकाधिक विद्यार्थी व पालकांचे बँक खाते उघडण्याचे नियोजन आहे. ज्यांचे बँक खाते नाहीत, त्यांना मुख्याध्यापकांच्या सहीने रक्कम काढता येईल, असे शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी संजय नाईकडे यांनी सांगितले.

इतर साहित्यांची रक्कम डीबीटीद्वारे

गणेवश व स्वेटर वगळून इतर शालेय साहित्याचे वितरण पालिका करणार नाही. पुणे महापालिकेच्या धर्तीवर त्या साहित्याची रक्कम विद्यार्थी किंवा पालकाच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे जमा केली जाणार आहे. त्यासाठी विद्यार्थी व पालकांचे बँक खाते क्रमांक जमा करण्यात येत आहेत. संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांच्या बँक खात्यात विद्यार्थ्यांची रक्कम जमा केली जाणार आहे. त्यांच्याकडून विद्यार्थी व पालकांच्या बँक खात्यात रक्कम पाठविली जाणार आहे. त्यासाठी पूर्वी खरेदी करून बिल सादर करण्याची अट काढून टाकण्यात आली आहे. त्यामुळे बँक खात्यात जमा झालेल्या रकमेतून पालकांना साहित्य खरेदी करता येणार आहे. त्यात वह्या, पुस्तके, बूट, मोजे, प्रयोगवही, चित्रकला वही, दप्तर या साहित्यांचा समावेश आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे, असे शिक्षण विभागाचे उपायुक्त संदीप खोत यांनी सांगितले.

Back to top button