पिंपरी: 1600 सफाई कर्मचारी बोनसपासून वंचित | पुढारी

पिंपरी: 1600 सफाई कर्मचारी बोनसपासून वंचित

पिंपरी, पुढारी वृत्तसेवा: महापालिकेत कायम तत्त्वावर कार्यरत असलेले अधिकारी व कर्मचार्‍यांना बोनस जाहीर झालेला असताना अद्याप कंत्राटी सफाई कर्मचार्‍यांना बोनस जाहीर झालेला नाही. त्यामुळे याविरुद्ध येत्या मंगळवारी (दि. 18) महापालिका भवनासमोर आंदोलन करण्याचा पवित्रा सफाई कर्मचार्‍यांकडून घेण्यात येणार आहे.

अधिकारी, कर्मचार्‍यांना 8.33 टक्के मिळणार बोनस जाहीर

महापालिकेच्या वतीने यंदा महापालिका अधिकारी व कर्मचार्‍यांना 8.33 टक्के बोनस आणि 20 हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. एकीकडे अधिकारी व कर्मचार्‍यांना बोनस व सानुग्रह अनुदान जाहीर झालेला असताना महापालिकेच्या 8 क्षेत्रीय कार्यालयांतर्गत कार्यरत असलेल्या 1 हजार 600 कंत्राटी सफाई कर्मचार्‍यांना अद्याप हा बोनस जाहीर झालेला नाही. अवघ्या दहा दिवसांवर दिवाळी येऊन ठेपली आहे. मात्र, अद्यापही याबाबत निर्णय जाहीर न झाल्याने कंत्राटी सफाई कर्मचार्‍यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

कामगारांचा आंदोलनाचा इशारा

कंत्राटी सफाई कर्मचार्‍यांच्या बोनसचा प्रश्न मार्गी लावण्यात यावा. अन्यथा, याविरुद्ध महापालिकेवर तीव— आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सफाई कर्मचार्‍यांकडून देण्यात आला आहे. या प्रश्नावर नुकतीच भोसरी येथे कष्टकरी कामगार पंचायतीची बैठक पार पडली. या बैठकीत बोनससाठी लढा देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. तसेच, महापालिका आयुक्तांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. आयुक्तांनी तातडीने कंत्राटी सफाई कामगारांना बोनस द्यावा. बोनस न दिल्यास त्याविरुद्ध तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा कष्टकरी कामगार पंचायतच्या सरचिटणीस मधुरा डांगे यांनी दिला आहे.

महापालिकेतील कायम कामगारांची दिवाळी गोड झाली आहे. त्यांना बोनस जाहीर झाला आहे. मात्र, अद्याप कंत्राटी सफाई कर्मचार्‍यांना बोनसची रक्कम जाहीर करण्यात आलेली नाही. त्यांनाही दिवाळीनिमित्त बोनस मिळणे गरजेचे आहे. त्यांच्या या बोनसच्या प्रश्नासंदर्भात येत्या मंगळवारी (दि. 18) दुपारी 3 वाजता महापालिका भवनासमोर आंदोलन करण्यात येईल.
– आशा कांबळे, अध्यक्षा, महिला घरकाम

Back to top button