पीएमपीची बस थांबली नाही; म्हणून प्रवाशाने केला आरडाओरडा, व्हिडियो होतो आहे व्हायरल | पुढारी

पीएमपीची बस थांबली नाही; म्हणून प्रवाशाने केला आरडाओरडा, व्हिडियो होतो आहे व्हायरल

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  पीएमपी बसमध्ये चालक-वाहक आणि प्रवासी यांचे वाद नेहमी ठरलेलेच. परंतु, पिंपरी-चिंचवड परिसरात बसमध्ये एका प्रवाशाचा चालकाशी बस थांब्यावर गाडी न थांबल्यामुळे वाद झाला. त्यामुळे चालकानेही रागाच्या भरात गाडीचे दरवाजे उघडले नाहीत. यामुळे प्रवाशाने ‘वाचवा… वाचवा… ड्रायव्हर मला किडनॅप करतोय… असे म्हणत आरडाओरडा केला अन गर्दी जमवली.
पीएमपी बसमध्ये घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

पीएमपीची ही बस इलेक्ट्रिक बस होती. बालेवाडी परिसरात प्रवाशांना घेऊन जात असताना ही घटना घडली. प्राथमिक पाहणीत चालक आणि प्रवाशाचे गाडी बस थांब्यावर न थांबवल्यामुळे वाद झाले. त्यानंतर चालकाने गाडीचे दरवाजे बंद करून गाडी पोलीस चौकीच्या दिशेने घेऊन जाण्याचा दम दिल्यानंतर प्रवाशाने असा आरडाओरडा केल्याचे दिसत आहे. याबाबत पी एम पी एम एल चे मुख्य वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे म्हणाले, पिंपरी चिंचवड परिसरात इलेक्ट्रिक बसमध्ये ही घटना घडली आहे. या संदर्भातील माहिती आम्ही घेत आहोत मात्र प्रवाशांनी अशा प्रकारे गैरवर्तन करून इतर प्रवाशांना त्रास होईल असे वागू नये. चालकाबाबत तक्रार असल्यास पीएमपीच्या टोल फ्री क्रमांक वर तक्रार करावी.

Back to top button