पिंपरी : अर्धे वर्षं सरले तरीही रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम रेंगाळलेलेच | पुढारी

पिंपरी : अर्धे वर्षं सरले तरीही रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम रेंगाळलेलेच

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  वाकड-दत्तमंदिर रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम अद्याप पूर्ण होऊ शकलेले नाही. डांगे चौकापासून शिवनगरीपर्यंतच्या रस्त्याचे काम सध्या पूर्ण झाले आहे. त्यापुढील सर्व रस्त्याचे काम संथ गतीने सुरू आहे. हा सिमेंटचा रस्ता कधी पूर्ण होणार, तसेच धूळ व खड्ड्यांपासून आमची कधी मुक्तता होणार, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.

सेवा वाहिन्या स्थलांतरास वेळ
थेरगाव-डागे चौकापासून ते वाकड पोलिस चौकीच्या अलीकडे पहिल्या टप्प्यात 636 मीटर इतक्या अंतरातील रस्त्याचे काम करण्यात येत आहे. दीड वर्षापूर्वी या रस्त्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली. सुरुवातीला रस्त्याच्या कामात अडथळा ठरणार्‍या जलवाहिन्यांचे स्थलांतर करावे लागले. तसेच, रस्त्याच्या खाली भूमिगत विद्युततारा असल्याने काळजीपूर्वक काम करावे लागले. तसेच, पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी नव्याने स्टॉर्म वॉटरलाइन टाकाव्या लागल्या. या सर्व कामांमुळे या रस्त्याचे काम रेंगाळल्याचे कार्यकारी अभियंता देवन्ना गट्टूवार यांनी सांगितले.

महिनाभरात पहिला टप्पा पूर्ण
येत्या महिनाभरात रस्त्याच्या कामाचा पहिला टप्पा म्हणजे डांगे चौक ते वाकड पोलिस चौकीच्या अलीकडील 636 मीटर रस्त्याचे काम पूर्ण केले जाणार आहे. या कामासाठी सप्टेंबर महिन्यांपासून तीन महिन्यांची पहिली मुदतवाढ देण्यात आली आहे. तथापि, महिनाभरातच हे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. या कामासाठी आठ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

कामाची संथगती
दत्त मंदिर रस्त्याच्या दुसर्‍या टप्प्यातील कामात वाकड पोलिस चौकीपासून वाकड चौकापर्यंतच्या रस्त्याचे काम केले जात आहे. त्यासाठी येथील ड्युडेल सोसायटी ते उत्कर्ष चौक या अंतरातील जलवाहिनी स्थलांतर करण्यात आली आहे. तसेच, येथील रस्त्यात अडथळा ठरणार्‍या विद्युततारा हलविण्याचे काम करण्यात येत आहे. सध्या रस्त्याच्या कामासाठी 70 मीटर अंतरात खोदकाम करण्यात आले आहे. मार्च-2022 मध्ये या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली. गेल्या सात महिन्यांत रस्त्याचे काम विशेष पुढे सरकलेले नाही. कामाची गती संथ राहिली आहे. या कामासाठी एकूण 61 कोटी रुपये खर्च मंजूर केलेला आहे.

 

Back to top button