निवडणूक आयोगाची मोठी घोषणा! ठाकरे गटाला मिळाले नवे ‘नाव’ नवे ‘चिन्ह’ | पुढारी

निवडणूक आयोगाची मोठी घोषणा! ठाकरे गटाला मिळाले नवे ‘नाव’ नवे ‘चिन्ह’

पुढारी ऑनलाईन डेस्क : उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटाच्या नावाची आणि चिन्हांची लढाई अखेर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या महत्त्वपूर्ण निर्णयानंतर थांबली आहे. आयोगाने आज (दि. 10) सायंकाळी ठाकरे आणि शिंदे गटांसाठी नव्या नावाची आणि चिन्हांची घोषणा केली. यात उद्धव ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि मशाल हे चिन्ह देण्यात आले आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या गटाला बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव देण्यात आले आहे.

दरम्यान, शिवसेना हे नाव आणि या पक्षाचे चिन्ह धनुष्यबाण हे चिन्ह शनिवारी (दि. 8) अंधेरी पोटनिवडणुकी पुरते गोठवल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले होते. त्यामुळे दोन्ही गटांना शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्हाचा वापर करता येणार नाही. शिवसेनेचे निवडणूक चिन्ह गोठवल्यानंतर निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना पक्षाची पर्यायी नावे आणि चिन्हे मागितली होती. यानंतर सोमवारी दुपारी एक वाजेपर्यंत ठाकरे आणि शिंदे गटाने निवडणूक चिन्ह आणि नावे आयोगाकडे पाठवली होती. अखेर रात्री आठ वाजण्याच्या सुमारास आयोगाने मोठी घोषणा केली. यात मशाल हे चिन्ह ठाकरे गटाला देण्यात आले. मात्र, शिंदे गटाच्या चिन्हाबाबत निर्णय देण्यात आलेला नाही.

ठाकरे आणि शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे पाठवलेल्या शिवसेनेच्या नव्या नाव आणि चिन्हांपैकी दोन पर्याय समान होते. दोन्ही गटांनी त्रिशूल आणि उगवता सुर्य या चिन्हांचा पर्याय ठेवल्याची माहिती मिळाली होती. ठाकरे गटाने त्रिशूल, उगवता सुर्य आणि पेटती मशाल या चिन्हांचे पर्याय ठेवले, तर शिंदे गटाने त्रिशूल, उगवता सुर्य आणि गदा या चिन्हांचे पर्याय दिले होते. अशा स्थितीत दोन्ही गटांकडून त्रिशूळ आणि उगवता सूर्य ही समान चिन्हे झाल्याने आयोगाकडून ठाकरे गटाला पेटती मशाल दिल्याचे समजते आहे. मात्र, शिंदे गटाच्या चिन्हाबाबत अद्याप निर्णय देण्यात आलेला नाही.

शिवसेना हे नाव व धनुष्यबाण चिन्ह गोठविले गेल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने सोमवारी ठाकरे गटाला ‘मशाल’ हे चिन्ह देण्याचा निर्णय घेतला आहे. ठाकरे गटाने ‘मशाल’ बरोबरच उगवता सूर्य आणि त्रिशूळ या चिन्हांचा पर्याय आयोगाला दिला होता. या गटाने दिलेल्या तीन नावांपैकी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) हे नावदेखील आयोगाने मंजूर केले आहे. दुसरीकडे आयोगाने शिंदे गटाने दिलेल्या तीन नावांपैकी ‘बाळासाहेबांची शिवसेना’ या नावावर मोहोर उमटवली आहे.

दरम्यान निवडणूक आयोगाने शिंदे गटाला चिन्हांसाठी तीन पर्याय नव्याने देण्याचे निर्देश दिले आहेत. शिवसेना हे नाव व धनुष्यबाण चिन्ह गेल्या शनिवारी गोठविण्यात आले होते. त्यावेळी तीन नावे व तीन चिन्हांचे पर्याय सोमवारी दुपारपर्यंत देण्याचे निर्देश आयोगाने दोन्ही गटांना दिले होते. त्यानुसार दोन्ही गटांनी प्रत्येकी तीन नावे व तीन चिन्हांचे पर्याय आयोगाला सादर केले होते. ठाकरे गटाने दिलेल्या तीनपैकी दोन चिन्हांचा म्हणजे ‘त्रिशूळ’ आणि ‘उगवता सूर्य’ यांचा पर्याय शिंदे गटाकडूनही देण्यात आला होता. शिंदे गटाकडून तिसरा पर्याय म्हणून ‘गदा’ चिन्ह देण्यात आले होते.

मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघासाठी येत्या 3 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाला नाव आणि चिन्हाबाबत लवकर घेणे आवश्यक ठरले होते. शिंदे गटाच्या निवडणूक चिन्हाचा निर्णयदेखील तात्काळ घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दोन्ही गटांकडून जी नावे देण्यात आली होती, त्यात प्रामुख्याने बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख होता. शिंदे गटाने दिलेल्या नावात शिवसेना बाळासाहेब ठाकरे, बाळासाहेबांची शिवसेना व शिवसेना बाळासाहेबांची ही नावे होती. यातील बाळासाहेबांची शिवसेना हे नाव आयोगाने मंजूर केले आहे.

ठाकरे गटाकडून जी नावे देण्यात आली आहेत, त्यात शिवसेना (बाळासाहेब ठाकरे), शिवसेना (प्रबोधनकार ठाकरे) व शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) यांचा समावेश होता. यातील शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) हे नाव मंजूर झाले आहे.

Back to top button