बिबवेवाडी : अवजड वाहतूक थांबणार कधी? मार्केट यार्ड परिसरातील नागरिकांचा सवाल | पुढारी

बिबवेवाडी : अवजड वाहतूक थांबणार कधी? मार्केट यार्ड परिसरातील नागरिकांचा सवाल

बिबवेवाडी; पुढारी वृत्तसेवा: मार्केट यार्ड येथील गंगाधाम चौकात अवजड वाहतुकीमुळे अनेक छोटे, मोठे अपघात होत आहेत. तसेच नागरी वस्तीच्या भागात या वाहनांना दिवसा प्रवास करण्यास बंदी आहे. यामुळे या भागातील अवजड वाहतूक थांबणार कधी, असा प्रश्न येथील रहिवासी व व्यापार्‍यांनी उपस्थित केला.

पुणे शहरातील अवघड वाहतुकीचा प्रश्न पुन्हा एकदा आला असतानाच गंगाधाम चौकात सिमेंटचे ‘रेडी मिक्स’ वाहनांसह इतर अवजड वाहनांची भरधाव वेगाने वाहतूक सुरू आहे. त्यामुळे या ठिकाणी अनेक वेळा छोटे-मोठे अपघात होत आहेत. यामुळे प्रशासन पुन्हा एकदा मोठ्या अपघाताची वाट पाहते की काय, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.

शत्रुंज मंदिराकडून गंगाधाम चौकाकडे येत असलेल्या तीव्र उतारावर अनेक वेळा अवजड वाहनांना ब्रेक लागत नाही. त्यामुळे या ठिकाणी अनेक वेळा अपघात झाले आहेत. तसेच गंगाधाम चौकातून कात्रज-कोंढव्याकडे जाणारी रस्त्यावर अवजड वाहने बंद पडतात. तर कधी ‘रेडी मिक्स’च्या वाहनांमधील सिमेंट रस्त्यावर पडत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे दुचाकी घसरून अपघात होत आहेत. याकडे वाहतूक पोलिसांनी लक्ष देण्याची मागणी नागरिक व व्यापार्‍यांकडून होत आहे.

जयंतीलाल शहा म्हणाले,‘बिबवेवाडी, महर्षीनगर, मुकुंदनगर, स्यालीसबरी पार्क परिसरात अनेक ठिकाणी मोठमोठी विकासकामे चालू आहेत. त्या ठिकाणी मातीचे डंपर व ‘रेडी मिक्स’च्या गाड्या, पाण्याचे टँकर, तसेच वाळू, सिमेंटची वाहतूक करणार्‍या वाहनांची दिवसा वर्दळ असते. या अवजड वाहनांना केवळ रात्रीच्या वेळी वाहतूक करण्यास परवानगी द्यावी. त्याकडे वाहतूक पोलिसांनी लक्ष द्यावे.’

धान्य बाजारातील मोठ्या गाड्या दिवसा महापालिकेच्या हाद्दीत आल्या, तर वाहतूक पोलिस कारवाई करतात. मग मार्केटयार्ड, गंगाधाम चौक परिसरात ‘रेडी मिक्स’च्या गाड्या व डंपर कोणाच्या आशीर्वादाने चालतात. यामुळे अनेक वेळा अपघात घडलेले आहेत. गंगाधाम चौकातील वाहतुकीवर यामुळे मोठा ताण येत आहे.
                                                                -सनी खरात,
                                   सामाजिक कार्यकर्ते, मार्केट यार्ड पुणे.

मार्केट यार्ड परिसरातील गंगाधाम चौकातील वाहतुकीवर अवजड वाहनांमुळे ताण येत असेल, तर अशा वाहनांवर कारवाई करण्यात येईल.
                                                            -राहुल श्रीरामे,
                                                     उपायुक्त, वाहतूक शाखा

 

Back to top button