T20 World Cup : टीम इंडियाचे ऑस्ट्रेलियाला टेक ऑफ! | पुढारी

T20 World Cup : टीम इंडियाचे ऑस्ट्रेलियाला टेक ऑफ!

मुंबई : भारतीय संघ गुरुवारी ऑस्ट्रेलियात होणार्‍या टी-20 वर्ल्डकप (T20 World Cup) स्पर्धेसाठी रवाना झाला. बीसीसीआयने टीम इंडियाचे खेळाडू व सहायक स्टाफ सदस्यांचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करून ही माहिती दिली. रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, लोकेश राहुल, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक आदी 14 खेळाडूच या फोटोत दिसल्याने चाहते बुचकळ्यात पडले आहेत. त्यात अष्टपैलू खेळाडू दीपक हुडा याच्या दुखापतीबाबत मोठे अपडेटस् समोर आले आहेत. जसप्रीत बुमराहच्या माघारीनंतर त्याची रिप्लेसमेंट अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही आणि त्यामुळेच 14 खेळाडू ऑस्ट्रेलियासाठी रवाना झाले आहेत.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20  मालिकेपूर्वी जसप्रीतच्या पाठीच्या दुखापतीने डोके वर काढले आणि त्याला वर्ल्डकपमधून माघार घ्यावी लागली. मोहम्मद शमी किंवा दीपक चहर हे दोन पर्याय बीसीसीआयसमोर आहेत; परंतु शमीला तंदुरुस्तीची चाचणी द्यावी लागणार आहे. दीपकची राखीव खेळाडूंमध्ये निवड झाली आहे; परंतु तो आणि श्रेयस अय्यर आफ्रिकेविरुद्ध वन-डे मालिका खेळणार आहे. 15 ऑक्टोबरपर्यंत भारताकडे बुमराहची रिप्लेसमेंट जाहीर करण्याचा कालावधी आहे. भारतासाठी एक आनंदाची बातमी म्हणजे दीपक हुडा तंदुरुस्त झाला असून तो टी-20 साठी उपलब्ध आहे.

‘संघातील अनेक खेळाडू यापूर्वी ऑस्ट्रेलियात खेळलेले नाहीत आणि त्यामुळे आम्ही एवढ्या लवकर जात आहोत. पर्थ येथील उसळी घेणार्‍या खेळपट्टीवर आम्ही सराव करणार आहोत. या संघातील 7-8 खेळाडूच ऑस्ट्रेलियात खेळले आहेत. त्यामुळे वेस्टर्न ऑस्ट्रेलियाविरुद्ध आम्ही सराव सामने खेळणार आहोत आणि त्यानंतर आयसीसीचे दोन सराव सामने आहेतच,’ असे रोहित शर्मा म्हणाला. दुखापतग्रस्त खेळाडूच ही भारतासमोरील समस्या नाही, तर डेथ ओव्हरमध्ये गोलंदाजांची सुमार कामगिरी ही खरी चिंतेची बाब आहे. (T20 World Cup)

भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, आर. अश्विन, यजुवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग.

Back to top button