मोरगावची राजेशाही मर्दानी दसरा परंपरा | पुढारी

मोरगावची राजेशाही मर्दानी दसरा परंपरा

अशोक वेदपाठक
मोरगाव : कर्‍हातीरी असे मोरगाव। तिथे नांदतो मोरया देवराव ॥ चला जाऊ यात्रेचे महापुण्या आहे । मनी इच्छिले मोरया देत आहे॥
दसरा-विजयादशमी हा समस्त मोरगाववासीयांचा आनंद सोहळा असतो. जळगाव (ता. बारामती) येथील राज्यातील हा राजेशाही दसरा छत्रपती शाहू महाराज सातारकर यांच्या आज्ञेनुसार वैभवशाली परंपरेनुसार सुरू आहे. मोरगाव येथील पुजारी (गुरव) सीताराम दत्तात्रय धारक (वय 82) यांनी राजेशाही दसर्‍याची माहिती दिली.

दसर्‍याला पहाटे पाच वाजता पाच तोफांचे पाच आवाज काढले जातात. पाच तोफा सोनोरा येथील पानसे सरदारांनी श्रीमयूरेश्वरास दिल्या आहेत. या तोफांचे मानकरी वाघू अण्णा वाघ, भिकाजी गणेश वाघ, सदाशिव बाळकृष्ण वाघ हे आहेत. या तोफाना दारूगोळा वाटपाची पाहणी भारत सासवडे (कासार) यांची मुले परंपरेनुसार पाहत आहेत. दारूगोळा भरणारी मंडळी नाईक (जाधव, चव्हाण), जगताप, तावरे, सणस, पवार आणि माडकर आहेत.

मयूरेश्वराची पहिली पूजा धारक गाडे परिवार पाहतात. श्री मयूरेश्वराला पहाटे गरम पाण्याने अभ्यंग स्नान घातले जाते. शाळकरी ढेरे यांची सकाळी सात वाजता पूजा होऊन मंगलवाद्य वाजवून धुपारती केली जाते. मंदिरात सर्व गावकरी येऊन शोभेच्या दारूची आतषबाजी करतात. सकाळी मंदिरात नऊ वाजता मंदिरासमोर पालखीचे नियोजन करण्यासाठी गावकर्‍यांची बैठक होते.

दारूगोळ्याच्या आतषबाजीला जे नळे वापरले जातात ते पोयटा मातीपासून बनविले जातात. हे नळे कुंभार मंडळी तयार करतात. बैठक झाल्यावर मानकर्‍यांना शिधा वाटप केले जाते. हा शिधा तिचा प्रसाद असतो. याचे सर्व सेवेकरी, चौघडेवाले, नगारावाले, हिलालवाले, पंखेवाले (छत्रीवाले) आणि राजदंड चव्हाण मंडळी (भालदार, चोपदार, हलगीवाले) हे शिधा वाटपचे मानकरी आहेत. वाटपाच्या वेळी विद्याधर वाघ हे सेवेकरींची नावे वाचतात.

दुपारी तीन वाजता श्री मयूरेश्वरास पेशवेकालीन दागदागिने, पोशाखधारक व गाडे परिवार करतात. 4 वाजल्यानंतर सर्वांना मंदिरात दर्शनासाठी प्रवेश दिला जातो. रात्री 8.30 वाजता पालखी सीमोल्लंघनासाठी निघते. या वेळी श्री मोरयासमोर पाच तोफांचे आवाज काढले जातात. भक्तगण फरशांवर भव्य अशी दारूगोळ्याची आतषबाजी करतात. संतोष भाजीत नळे शोभेची आतषबाजी करतात. बाजारतळावर दुष्ट प्रवृत्तीची प्रतिकृती तयार केली जाते. तिचे रात्री बारा वाजता दहन केले जाते.

त्यानंतर पालखीची पिंजारी काढली जाते. या वेळी देवास रेशमी गोफात बांधले जात. चिंतामणी मोरया गोसावी यांची आरती केली जाते. पिंजारीचे मानकरी रायचंद पुंजाराम शहा यांचे वंशज शैलेश शहा यांच्याकडे पिंजारी दिली जाते. शिवडीत हाणामारीचा खेळ खेळतात, नंतर पालखी फिरंगाईदेवी मातेकडे जाते. गोंधळींनी गोंधळ घातल्यानंतर पालखी बुद्धिमत्ता मंदिराकडे जाते. आरती होते, त्यानंतर तुकाईमातेच्या मंदिरात आल्यावर आरती करून पालखी गावात येते. येथील महादेव मंदिरात आरती होते. त्यानंतर तेथे श्री मरीमाता, श्री मारुती, श्री भैरवनाथ, श्री कालकाईदेवी यांच्या आरत्या केल्या जातात. तर, पालखी बारामती ते जेजुरी रस्त्याला येते.

पालखी सिद्धार्थनगर, ब—ाह्मणआळी, कुंभारवाडा ते सोनबा मंदिराकडे जाते. त्यावर ग्रामस्थ पालखीसमोर आतषबाजी करतात.
सोनबाच्या मंदिरात तीन जथाच्या पाटलाने आपटा पूजन करून पूजा ग्राम जोशी दिलीप वाघ करतात. या पूजेनंतर तीन जणांचे पाटील पालखीत ठेवतात .यानंतर वंशावळीचे वाचन शाहू महाराजांच्या गादीचे वारसदार वाघ करतात. नंतर पहिला अंगारा-आपट्याचा प्रसाद शैलेश वाघ यांना दिला जातो.

त्यानंतर संस्थान, शितोळे-देशमुख, दिलीप माधवराव तावरे जथा थोरला, जगता गोपीनाथ तावरे धाकटा, जथा किसान जीवराज तावरे, थोरला जथा वाघ मंडळी, मनोहर शिवराम वाघ, मधला जथा विघ्नहर भालचंद्र वाघ, धाकटा जथा मकरंद विनायक वाघ, गोसावी इनामदामध्ये वामन गोसावी धुंडीराज सुधाकर गोसावी आणि नंतर काळे महोत्सव घरी इनामदार या सर्व मंडळींना अंगारा व आपट्याचा मात्रा दिला जातो. सर्व जाती-धर्मांच्या लोकांना सीताराम दत्तात्रय धारक हे प्रसाद वाटतात.

पालखी धनगरवाड्याकडे येते. या ठिकाणी झाडाझुडपांमध्ये तोफांचे आवाज काढले जातात. पालखी माळी, लोहारआळीतून ग्रामपंचायतपासून चिंचेच्या बागेतून जाते. फेरीवाल्यांना ललकारी देऊन पिंजरी चढवली जाते. पुन्हा पालखी श्री महादेव, श्री मारुती मंदिरात आरती करून मुख्य पेठेतून मंदिरात येते. या वेळी गोसावी मंडळींची आरती असते. त्या वेळी त्यांना ललकारी देण्याचे काम अंकुश लंबोदर धारक करतात. मंडळी पंचारती ओवाळून आरती करतात. असा हा मोरगाव-बारामतीचा श्री मयूरेश्वराचा राजेशाही मर्दानी सोहळा ऐतिहासिक व राजेशाही असल्याची माहिती सीताराम दत्तात्रय धारक पुजारी (गुरव) यांनी दिली.

Back to top button