पुणे : निर्मला सीतारामन यांचा राष्ट्रवादीला पहिला दणका; केंद्राच्या योजना थेट ग्रा.पं. ला देणार | पुढारी

पुणे : निर्मला सीतारामन यांचा राष्ट्रवादीला पहिला दणका; केंद्राच्या योजना थेट ग्रा.पं. ला देणार

पुणे; पुढारी वृत्तसेवा: केंद्र शासनाच्या विविध लोक कल्याणकारी योजनांचा लाभ अधिकाधिक पात्र लाभार्थ्यांना मिळावा, यासाठी या योजना ग्रामपंचायत स्तरावर राबविण्याचा निर्णय केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घेतला आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती, शिरूर लोकसभा मतदारसंघातील लाभार्थ्यांना याचा फायदा होऊ शकणार असल्याने आपल्या बारामती दौर्‍यानंतर सीतारामन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला हा पहिला मोठा दणका दिल्याचे मानले जात आहे.

भाजपचे आमदार आणि बारामती लोकसभा मतदार संघाचे प्रभारी प्रा. राम शिंदे यांनी संदर्भात सांगितले, की निर्मला सीतारामन यांनी लोकसभा प्रवास कार्यक्रमाअंतर्गत नुकताच बारामती मतदारसंघाचा दौरा केला. या दौर्‍यात लाभार्थ्यांशी संवाद साधला असता, केंद्र शासनाच्या विविध विकास योजना त्यांच्यापर्यंत पोहोचत नसल्याचे निदर्शनास आले होते. याबाबत विविध संस्था आणि नागरिकांनी सीतारामन यांना निवेदने दिली होती.

योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत प्रभाविपणे पोहोचविण्यासाठी त्या ग्रामपंचायत स्तरावर राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बँक खाती वाढविणे, विमा आणि पेन्शन योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणे, कृषी उत्पन्न संस्था आणि बचत गटांना कर्ज वितरण करणे, पशुसंवर्धन, दुग्धोत्पादन व मासेमारी व्यवसायासाठी मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज उपलब्ध करून देणे, किसान क्रेडिट कार्डचे वाटप करणे आदी योजनांचा समावेश यामध्ये असून सध्याच्या बँक खात्यांना मोबाईल आणि आधार कार्ड जोडून अधिकाधिक लाभार्थ्यांना योजनांचे फायदे दिले जाणार आहेत.

निवेदने लागली मार्गी
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 22 ते 24 सप्टेंबरदरम्यान बारामती मतदारसंघाचा दौरा केला होता. त्या वेळी त्यांना अनेक निवेदने देण्यात आली होती,ती मार्गी लागण्यावरच या दौर्‍याचे यश अवलंबून होते. सीतारामन यांनी त्या दिशेने हालचाली सुरू केल्याने राष्ट्रवादीला हा मोठा दणकाच दिला आहे.

 

Back to top button