सोनई परिसरात जोरदार पावसाने पिके पाण्यात | पुढारी

सोनई परिसरात जोरदार पावसाने पिके पाण्यात

सोनई : पुढारी वृत्तसेवा : सोनई व परिसरात मुसळधार पावसामुळे पिकांची वाट लागली असून, कपाशी, बाजरी व सोयाबीन पिकांत मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने पीक हातातून जाण्याची भीती निर्माण व्यक्त केली जात आहे. पावसात भिजलेल्या कापसासह धान्याला जागेवरच कोंब फुटले असून, हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यामुळे शेतकर्‍यांवर ऐन दिवाळीत संकट कोसळले आहेत. सततच्या जोरदार पावसाने सोनई, शिरेगाव, खेडले परमानंद, हनुमानवाडी, करजगाव,शिंगणापूर,वंजारवाडी, पानसवाडी मध्ये जोरदार पाऊस झाल्याने पूर्ण सोयाबीनमध्ये पाणी गेलं आणि आता सोयाबीनच्या शेंगांना कोंब फुटले आहेत. सोयाबीन खराब झाले आहे. कपाशी पिकाची झाडे पिवळी पडली असून, अतिरिक्त फवारणी करून ही झाड वाचेल की नाही, सांगता येत नाही. पावसामुळे जमिनीलगतच्या कैर्‍या तसेच वरचा बहार तरी आपल्या हाती येईल, अशी आशा शेतकरी बाळगून होते.

प्रत्यक्षात पाऊस थांबला नसल्याने फांद्याना लागलेल्या कापसाच्या बोंडांमधील सरकीलाही आता कोंब फुटले आहेत.कपाशी, सोयाबिन हातातून गेली असुन लावलेला खर्चही आता भरून निघणार नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. प्रशासनानं लवकरात लवकर पंचनामा करावा आणि नुकसान भरपाई द्यावी, अशी परीसरातील शेतकर्‍यांची अपेक्षा आहे. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून सातत्याने सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे खरीप हंगामातील ज्वारी, बाजरी, मका, सोयाबीन आणि कापूस पिकाची दयनीय अवस्था झाली आहे.

Back to top button