नाशिककरांकडून दसऱ्याची खरेदी; बाजारात मोठी उलाढाल | पुढारी

नाशिककरांकडून दसऱ्याची खरेदी; बाजारात मोठी उलाढाल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

तब्बल दोन वर्षांनी शारदीय नवरात्रोत्सव निर्बंधमुक्त साजरा केला जात असल्याने, भाविकांच्या उत्साहाला उधाण आले आहे. याचा परिणाम बाजारपेठेवरही दिसून येत असून, सर्वच क्षेत्रात मोठी उलाढाल दिसून येत आहे. त्यात दसऱ्याच्या खरेदीची भर पडल्याने, व्यापारीवर्ग सुखावला आहे. बुधवारी (दि. ५) दसरा साजरा केला जात असून, दसऱ्याच्या खरेदीसाठी रविवारी (दि. २) नाशिककरांनी बाजारात एकच गर्दी केल्याचे दिसून आले.

नवरात्रोत्सवाप्रमाणेच दसरादेखील तब्बल दाेन वर्षांनी निर्बंधमुक्त साजरा केला जात आहे. त्यामुळे यंदा खरेदीला उधाण आल्याचे बघावयास मिळत आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्यानिमित्त खरेदीला विशेष महत्त्व दिले जाते. वाहन, सराफ, इलेक्ट्रॉनिक्स, रिअल इस्टेट, रेडिमेड गारमेंट यासह किराणा खरेदीसाठी रविवारी बाजारात ग्राहकांनी मोठी गर्दी केल्याचे दिसून आले. विशेषत: वाहन बाजार तसेच इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदीकडे नाशिककरांचा कल दिसून येत आहे. दसऱ्याच्या दिवशी वाहन तसेच इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदी शुभ मानले जात असल्याने सध्या बुकिंगचा धडाका दिसून येत आहे. त्याचबरोबर रिअल इस्टेटमध्येही बुकिंगला प्राधान्य दिले जात आहे. तसेच दसऱ्याच्या दिवशी नवीन कपडे खरेदी केले जात असल्याने कपडा बाजारातदेखील मोठी उलाढाल होत आहे.

दरम्यान, दसऱ्याअगोदर आलेल्या रविवारी खरेदीसाठी नाशिककरांनी मोठी गर्दी केल्याचे दिसून आले. पूजेचे साहित्यही मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात आले. पावसाच्या भीतीने अनेकांनी सकाळच्या सुमारासच बाजारात जाणे पसंत केले. अनेक जण सहपरिवार खरेदीसाठी बाहेर पडले. त्यामुळे रविवार हा खरेदीचा वार ठरल्याने, व्यापाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण बघावयास मिळत आहे.

सराफ बाजाराला चकाकी

दसऱ्याला स्वस्त सोने खरेदी करण्याची नागरिकांना संधी मिळणार आहे. यंदा बऱ्यापैकी सोन्याचे दर कमी झाल्याने, नाशिककर सोने लुटण्यासाठी सज्ज आहेत. रविवारी सोन्याचा दर १० ग्रॅम २२ कॅरेटसाठी ४६ हजार ५०० इतका नोंदविला गेला. गेल्या काही दिवसांपासून हा दर स्थिर असल्याने, दसऱ्यापर्यंत त्यामध्ये फारसा बदल होणार नसल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत यंदा सोने-चांदी खरेदीला चांगला प्रतिसाद मिळेल, असा अंदाज वर्तविला जात असल्याने सराफ बाजार सज्ज झाला आहे.

Back to top button