लेण्याद्री : आदिवासींना नक्षलवादी संबोधून दिशाभूल : शरद पवार | पुढारी

लेण्याद्री : आदिवासींना नक्षलवादी संबोधून दिशाभूल : शरद पवार

लेण्याद्री; पुढारी वृत्तसेवा: आदिवासी हे देशातील मूळ रहिवासी असून, काही मंडळी त्यांना वनवासी, नक्षलवादी संबोधून दिशाभूल करत आहेत. सध्या आदिवासी भागातील मुलींवरील अत्याचार वाढत आहेत, भूकबळीच्या घटना घडत आहेत. या अत्याचाराविरुद्ध लढा देणार्‍या युवकांना तुम्ही दोष कसे देता, असा प्रश्न ज्येष्ठ नेते, खासदार शरद पवार यांनी विरोधकांना विचारला.

लेण्याद्री (ता. जुन्नर) येथे बिरसा ब्रिगेड (सह्याद्री, सातपुडा) व आदिवासी विचार मंच आयोजित आदिवासी समाज प्रबोधन मेळाव्यात पवार बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, जल-जंगल-जमीन या पर्यावरणीय त्रिसूत्रीवर आदिवासी समाज काम करत आहे. बिरसा ब्रिगेडचे काम जगाच्या कानाकोर्‍यात पोहचले असून आम्ही आदिवासी बांधवांच्या सोबत नेहमीच आहोत. याप्रसंगी बोलताना बिरसा ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश पेंदाम म्हणाले की, बिरसा ब्रिगेड व इतर आदिवासी संघटनांचे पालकत्व शरद पवार यांच्याकडे आहे. आता जगभरातील आदिवासी एकत्र होत असून आपणही एकजुटीने रहावे, असे आवाहन त्यांनी या वेळी आदिवासींना केले.

शिवनेरी किल्ल्यावरील कोळी चौथरा हे पराक्रमाचे प्रतीक असून त्याठिकाणी शासनाने कोनशिला व माहितीफलक लावावेत. शासकीय खात्यात भरती झालेल्या हजारो खोट्या आदिवासींना कमी करून खर्‍या आदिवासींना नोकरी मिळावी, यासह इतर मागण्यांसाठी मंत्रालयावर धडक मोर्चा काढणार आहे, असे छगन भुजबळ यांनी सांगितले. माजी गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले की, सध्या देशामध्ये समाजा-समाजामध्ये फूट पाडण्याचे काम सुरू असून आदिवासी बांधवांनी एकल विद्यालयासारख्या संघटनांच्या भूलथापांना बळी पडू नये.

या वेळी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, खा. डॉ. अमोल कोल्हे, आ. पाडवी, आ. डॉ. किरण लहामटे, आ. सुनील भुसारा आदींची भाषणे झाली. आदिवासींच्या खरेदी केलेल्या जमिनी परत मिळाव्यात, 9 ऑगस्टला जागतिक आदिवासी दिनानिमित्त राष्ट्रीय सुट्टी मिळावी, क्रांतिकारी मुंडा यांच्या आयुष्यावर धडे अभ्यासक्रमात समाविष्ट करावेत आदी मागण्या वक्त्यांनी केल्या. खेडचे आ. दिलीप मोहिते पाटील, आ. माणिकराव कोकाटे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. संजय काळे, पांडुरंग पवार, बिरसा ब्रिगेडचे पदाधिकारी व हजारोंच्या संख्येने आदिवासी उपस्थित होते.

अत्याचाराविरुद्ध लढा देणार्‍या युवकांना तुम्ही दोष कसा देता?
जुन्नर येथे आदिवासी मेळाव्यात उपस्थिती

क्रांतिकारी बिरसा मुंडा यांचे स्मारक उभारणार : आ. बेनके
आद्य क्रांतिकारक बिरसा मुंडा यांचे स्मारक उभारण्यासाठी प्रयत्न सुरू असून जोपर्यंत स्मारक पूर्ण होत नाही, तोपर्यंत निवडणुकीस उभा राहणार नाही, अशी घोषणा जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी केली. सहा जिल्ह्यांतील आदिवासींना एकत्र करून एक नवी क्रांती घडवून आणणार्‍या आ. बेनके व बिरसा ब्रिगेडच्या पदाधिकार्‍यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते शरद पवार यांनी याप्रसंगी कौतुक केले.

Back to top button