पुणे : पोलिस आयुक्त मोक्काची कारवाई शतकाच्या उंबरठ्यावर | पुढारी

पुणे : पोलिस आयुक्त मोक्काची कारवाई शतकाच्या उंबरठ्यावर

पुणे; पुढारी वृत्तसेवा: चतुश्रुंगी परिसरात दहशत माजविणार्‍या टोळी प्रमुखासह त्याच्या सात साथीदारांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम अंतर्गत कारवाई (मोक्का )करण्यात आली. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी केलेली ही 99 वी कारवाई असून ते आता मोक्काच्या शतकाच्या कारवाईच्या एक पाऊल दूर आहेत. या वर्षातील त्यांची ही 36 वी कारवाई आहे.

याप्रकरणी टोळी प्रमुख रोहित ऊर्फ प्रेम ऊर्फ ढेकण्या राहुल वाघमारे (वय 19) त्याचे साथीदार शुभम अशोक गायकवाड (वय 25), अनिकेत राजु पवार (वय 19), नयन संजय लोंढे (वय 19), अदित्य सचिन बाघमारे (वय 19) आणि अमित नारायण साबळे (सर्व रा. इंदिरा वसाहत, अण्णाभाऊ साठे चौक, गणेशखिंड रोड औंध) यांच्यासह दोन विधीसंघर्षित बालक यांच्यावरही मोक्काची 99 वी कारवाई करण्यात आली आहे.

बेकायदेशिर मार्गाने हिंसाचाराचा वापर करुन मारामारी करणे, खुनाचा प्रयत्न करणे, गंभीर दुखापत करणे, जीवे ठार मारण्याची धमकी देत, सार्वजनिक उपद्रव करणे आणि वाहनांची तोडफोड करून नुकसान करणे. घातक हत्यारे विनापरवाना जवळ बाळगून दहशत निर्माण करणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

या आरोपींविरूध्द मोक्का कारवाई करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचवरे यांनी उपायुक्त रोहीदास पवार यांचेमार्फतीने अपर आयुक्त नामदेव चव्हाण यांच्याकडे प्रस्ताव सादर केला. त्याला नामदेव चव्हाण यांनी मंजुरी दिली. पोलिस आयुक्त गुप्ता यांनी कार्यभार घेतल्यापासूनची ही 99 वी कारवाई आहे. त्यामुळे बहुतांशी शहरातील टोळी युध्दाला वचक बसल्याचे व शहरातील गुन्हेगारी टोळ्या कारागृहाची हवा खात आहे.

Back to top button