भंडारा : वाघ त्याला घेऊन जंगलात पळाला; प्रत्यक्षदर्शीने कथन केला थरार | पुढारी

भंडारा : वाघ त्याला घेऊन जंगलात पळाला; प्रत्यक्षदर्शीने कथन केला थरार

भंडारा, पुढारी वृत्तसेवा : ‘धान पिकाची पाहणी करुन आम्ही परत येत होतो. मी तेजरामच्या मागे होतो. तेवढ्यात पट्टेदार वाघाने त्याच्या मानेला पकडले. वाघ पाहून मी ताडकन झाडावर चढलो. वाघ त्याला खात होता, त्यानंतर वाघ त्याला घेऊन जंगलात पळाला. मी झाडावरुन खाली येऊन गावकऱ्यांना हाक मारली.’ असा थरारक अनुभव शुक्रवारी (दि.१) व्याघ्र हल्ल्यातील प्रत्यक्षदर्शी मनोज प्रधान याने कथन केला.

मनोजने सांगितलेल्या घटनाक्रमानुसार, शुक्रवारी सकाळी तेजराम आपल्या घरी आला होता. धान पिकाची पाहणी करण्यासाठी शेतावर सोबत येण्यास सांगितले. आम्ही दोघेही शेतावर गेलो. धान पिकाची पाहणी केली. त्यानंतर परत येत असताना शेळ्यांसाठी झाडाच्या फांद्या तोडण्यासाठी तेजराम पुढे गेला. मी त्याच्या मागे होतो. फांद्या तोडत असताना दबा धरुन बसलेल्या वाघाने अचानक तेजरामवर हल्ला केला. वाघाने त्याच्या मानेला पकडले. वाघ दिसताच मी झाडावर चढल्याचे त्याने सांगितले. झाडावरुन मनोजने घडलेला संपूर्ण प्रसंग पाहिला. वाघ त्याची हाडं तोडत होता. त्यानंतर वाघ त्याला खेचत घेऊन गेला.

मनोज प्रधान याने झाडावरुन उडी घेत अर्धा किलोमीटर अंतर धावत जात त्याने मोबाईलवरुन गावकऱ्यांना घटनेची माहिती दिली. शेकडोच्या संख्येने गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. घटनास्थळापासून दीड किलोमीटर अंतरावर तेजरामचा मृतदेह आढळून आला.

वन विभागापुढे आव्हान

२१ सप्टेंबर रोजी लाखांदूर तालुक्यातील इंदोरा जंगलात मासेमारी करणाऱ्या व्यक्तीला ठार केल्यानंतर सदर नरभक्षक वाघाला पकडण्यासाठी वन विभागाने नानाविध उपाययोजना केल्या. यापुढे एकही बळी जाऊ नये यासाठी रात्रीचा दिवस करण्यात आला. तरीसुद्धा ३० सप्टेंबर रोजी शेतकऱ्याला वाघाने ठार केले. सीटी-१ नामक वाघाने गेल्या ९ महिन्यांत गडचिरोली, चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १३ व्यक्तींना ठार केले आहे. त्यामुळे या वाघाला पकडण्याचे मोठे आव्हान वनविभागापुढे आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button